मुंबई : राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली असून, सुमारे तीन हजार धरणांमध्ये सध्या केवळ ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा तब्बल ९० टक्के होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून उपलब्ध पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील जलसाठ्याच्या सद्यस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार राज्यातील ३ हजार ३२ धरणे व प्रकल्पांची एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता १,४४१.१७ टीएमसी असून, ६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा १,०६८.८७ टीएमसी, म्हणजे ७४ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी १,२९०.८९ टीएमसी म्हणजे ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेतही राज्याच्या साठ्यात १९.६५ टीएमसीची घट झाली आहे.
प्रकल्पांच्या प्रकारानुसार पाहता मोठ्या प्रकल्पांमध्ये ८३ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ६४ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये केवळ ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी या तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ९८, ८० आणि ६१ टक्के साठा होता.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, प्रत्येक प्रमुख जलाशयातील उपलब्ध जिवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा आपत्कालीन बफर म्हणून राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा साठा सर्वसाधारण वापरासाठी न करता केवळ अत्यावश्यक परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याचे निर्देश आहेत.
पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपलब्ध साठा ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने परिस्थितीनुसार ही कपात आणखी वाढविण्याची मुभाही देण्यात आली आहे.
दरम्यान, उद्योगांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर किंवा पुनर्चक्रण करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिंचनासाठीही पिण्याचे व औद्योगिक पाणी यानंतरच उपलब्धतेनुसार पाणी देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
