मुंबई: अलनिनोमुळे यंदा राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवण्याची भिती व्यक्त केली जात असतानाच गेल्या काही दिवसापासून सर्वत्र पडणाऱ्या दमदार पावसामुळे धरणे भरु लागली असून पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे. राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर असतानाच आजही १७ जिह्यात तब्बल ७५८ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पाऊसच पडणार नाही. परिणामी राज्यावर दुष्काळाचे संकट येण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार संभाव्य दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. पंरतु सर्वांचे अंदाज- इशारे खोटे ठरवत राज्याच्या सर्वच भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागाला झोपडून काढल्यानंतर आता मराठवाडा, विदर्भातही समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे धरणे भरु लागली असून आजमितीस धरणांमधील एकूण पाणीसाठा ६८ टक्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा ७१ टक्के होता. पुणे आणि कोकण विभागातील बहुतांश धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून या धरणांमधील एकूण पाणीसाठा ९० टक्केपेक्षा अधिक आहे. नाशिक विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८० टक्केच्या वर गेला असून गेल्या वर्षी हाच साठा ७८ टक्के होता. मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, भातसा, मोडकसागर ही धरणे ९९ टक्के तर बारवी धरण ८४ टक्के भरले आहेत. मराठवाड्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा असून धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या ७४.५५ टक्केच्या तुलनेत ५९ टक्के इतका कमी आहे.

१७ जिल्हयात अजूनही टँकरने पाणीपुरवठा

राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस पडल्याने आणि धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असला तरी अजूनही ५० टक्के जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. आजमितीस १७ जिह्यातील ६१८ गावे आणि १६५१ वाड्यांमध्ये ७५८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ३९५ टँकर सुरु असून त्यातही छत्रपती संभाजीनगर जिह्यात२२४ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्हयात जोरदार पाऊस होत असतानाही ९४ गावे आणि २९४ पाड्यांना ९२ टंँकरने पाणीपुरठा केला जात आहे. तर अहिल्यानगर जिह्यात ११५ आणि जालना जिल्हयात १०८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.