मुंबई: ‘महाराष्ट्र हा एक देश असता तर तो जगातील ३० व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश ठरला असता. अनेकांच्या बलिदानातून घडलेले महाराष्ट्र राज्य हे आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनी व्यक्त केली.
राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनी फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे ‘हुतात्मा स्मारकास’ पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतातील ओळींचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथम केला. राज्याच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून देत ‘महाराष्ट्र दिन’ हा प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कामगार दिनाच्याही कामगारांना शुभेच्छा दिल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा उल्लेख करत ‘पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर असते,’असे सांगून कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले. राज्याच्या तसेच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या श्रमांमुळेच संपन्नतेची उभारणी झाली आहे. असे गौरोद्वागार त्यांनी काढले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल आदी उपस्थित होते.
विकसित महाराष्ट्र २०४७ कडे राज्याची वेगवान वाटचाल; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा विश्वास
देश विकसित भारत २०४७ कडे वेगाने वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ लाख कोटी डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. राज्य शासनाने तयार केलेले ‘विकसित महाराष्ट्र २०४७ कडे राज्याची वेगवान वाटचाल सुरु असल्याचा विश्वास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईच्या महापौर रितू तावडे आदी उपस्थित होते.
राज्याने जागतिक गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तब्बल ३१ लाख २५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. राज्याच्या नवीन उद्योग आणि गुंतवणूक धोरणातून ७० लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. या गुंतवणूकीतून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. राज्याने परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी राजशिष्टाचार विभागात स्वतंत्र ‘परकीय थेट गुंतवणूक’ कार्यासने निर्माण करून प्रशासकीय गती वाढवली आहे.
राज्यात पायाभूत सुविधा व सेवा विकासाला गती देण्यासाठी मित्रा मार्फत तयार केलेले सार्वजनिक खासगी भागिदारी धोरण २०२६ शासनाने मंजूर केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता देशाचे नवीन प्रवेशद्वार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईची वाहतूक कोंडी कमी करणारी मेट्रो लाईन- ३ पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात ३४० किमी लांबीचे जलमार्गाचे जाळे विस्तारण्यात येत आहे. पालघरमधील ‘वाढवण बंदर’ प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे १२ लाखाहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. खंडाळा ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
शेतकरी कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. खरीपात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या एक कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ हजार ९५० कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली आहे. चालू रब्बी हंगामात नुकसानग्रस्त एक लाख ८० हजार शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांची मदत दिली आहे. बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना ५० हजार ९१४ कोटी रुपये इतकी पीक कर्जाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या सुमारे ४५ लाख शेतीपंपाना एकूण २५ हजार ८७ कोटी रुपये वीजदर सवलत देण्यात आली. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये स्थापित केलेल्या ४५ हजार ९११ सौर पंपांच्या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. महाराष्ट्र शाश्वत ऊर्जेत देशाला दिशा दाखवत असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ अंतर्गत उत्कृष्ट विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ आणि अमेरिकेतील ‘नासा’ यांसारख्या नामांकित संस्थांना भेट देण्याची संधी मिळत आहे.
विधान भवन येथे ध्वजवंदन सोहळा साजरा
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाच्या प्रांगणात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा साजरा झाला.यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन करुन आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे, असे आवाहन करून त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
