मुंबई : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यभरातील विक्रेत्यांना अंड्यांवर ‘एक्सपायरी डेट’ टाकणे अनिवार्य करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अंड्यांवर उत्पादन आणि एक्सपायरी डेट (वापराची अंतिम मुदत) टाकण्याची सक्ती येत्या १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी होऊ लागली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने अन्न सुरक्षा लक्षात घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला असून १ एप्रिल २०२६ पासून राज्यातील प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट छापणे बंधनकारक केले आहे. या नव्या नियमानुसार अंडे कधी दिले (laying date) आणि ते कधीपर्यंत वापरण्यास योग्य आहे (expiry date) ही माहिती अंड्याच्या कवचावर स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे. नियमांचे पालन न केल्यास अंडी नष्ट केली जाऊ शकतात किंवा “मानवी वापरासाठी अयोग्य” असा शिक्का मारला जाऊ शकतो, असेही म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रतही हा निर्णय लागू करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी या बाबतची मागणी केली आहे. त्यावरून आता चर्चा होऊ लागली आहे. संपूर्ण देशातच हा नियम लागू करावा अशी मागणी समाज माध्यमावर होऊ लागली आहे. याबाबत ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले की, मुंबईतही अंडी विक्रेत्यांकडून खरेदी केलेली अंडी एक-दोन दिवसांतच खराब होतात. खरेदी करत असलेली अंडी ताजी आहेत की फार दिवसांपूर्वीची, याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. काही ठिकाणी अंडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर अंडी खराब निघाल्याने ती फेकून द्यावी लागत आहेत. अशा खराब अंड्यांची विक्री करताच कामा नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अंड्यांवर ‘एक्सपायरी डेट’ची सक्ती करणारा निर्णय घेतला पाहिजे, असे मत दहिबावकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रथिनयुक्त आहारासाठी अंड्याना मागणी
अनेक ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, व्यायामपटू, रुग्ण प्रोटीनसाठी आहारात प्राधान्याने अंड्यांचा समावेश करतात. आहारातज्ञ देखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करून राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळ रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असेही दहिवावकर यांनी म्हटले आहे.
