राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसोबत त्यांच्या वरळी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी वरळी, दादर, माहिममध्ये झालेल्या विकासकामांची पाहणी केली. विशेष म्हणजे अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एकाच गाडीने प्रवास केला. यावेळी आदित्य ठाकरे गाडी चालवत होते. दरम्यान अजित पवार आणि आदित्य ठाकरेंच्या या एकत्रित पाहणी दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

पाहणी दौऱ्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चेचसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्रीदेखील अनेकदा मातोश्रीवरुन वर्षावर येताना गाडी चालवतात. गाडी चालवली म्हणून असे अंदाज बांधण्याची गरज नाही. आमचं तीन पक्षांचं सरकार असून काही मित्रपक्षांनीही पाठिंबा दिला आहे”.

MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

Video: अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती

पुढे ते म्हणाले की, “जिथे चांगलं चाललं आहे ते पाहून आपल्या भागातही राबवावं असा प्रयत्न आहे. मुंबई चांगली दिसावी तसंच मुंबईत खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तसंच युवा नेते आदित्य ठाकरेंचा आहे. सर्वांनी एकत्र काम करण्याचं ठरलं आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचाही अधिकार आहे. निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यासंबंधी सध्या चर्चा करण्याचं काही कारण नाही”.

“चांगल्या उद्धेशाने मला हे पहायचं होतं. त्यामुळेच आम्ही प्रसारमाध्यमांना काही माहिती दिली नव्हती. सकाळी ७ ते ९ आमचा चांगला दौरा झाला. त्यानंतर तुम्हाला माहिती मिळाली. काही लोक मुद्दामून जातात, पाहणी करतात…मग असं बोटं करा सांगत फोटो काढले जातात. आम्हाला तसली कोणतीही नौटंकी करायची नव्हती. आमचा त्यासंबंधी कोणताही विचार नव्हता. चांगल्या कामाला जास्त काही मदत हवी तर केली पाहिजे या मताचे आम्ही असल्याने ही पाहणी केली”. महामंडळ वाटप ठरलेलं आहे, लवकरच घोषणा करु अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“विकासकामं पाहण्याची उत्सुकता होती”

“बऱ्याच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदित्य ठाकरेंना सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे फोटो माझ्या मोबाइलवर आले आहेत. त्यामुळे काय विकासकामं सुरु आहेत हे पाहण्याची उत्सुकता मला होती. त्यामुळे आम्ही दोघांनी सकाळी वरळीपासून ते माहीमपर्यंत पाहणी करायचं ठरवलं होतं. हा आमचा खासगी दौरा होता. कोणाला त्रास होऊ नये आणि नीट पाहणी करता यावी यासाठी कोणाला सांगितलं नव्हतं,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

“मुंबई, मुंबई उपनगराला कमी निधी मिळतो”

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे करोनाच्या संकटातही अडचणी न येता कामं होत आहे. आदित्य ठाकरे, अदिती तटकरे असे कही तरुण सहकारी मंत्रिमंडळात आहेत. जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा करत असताना त्या जिल्ह्यांची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, मानव विकास निर्देशांक आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या यासंबंधी एक नियम केला जातो आणि वाटप केला जातो. पण त्या मानाने मुंबई, मुंबई उपनगराला कमी निधी मिळतो. मुंबई देशाची आर्थिक राजनाधी असून आणखी निधी मिळाला तर चांगली कामं करता येतील. सीएसआरचा फंड काही प्रमाणात राज्य सरकारचा फंड. पालिकेचा फंड अशा पद्दतीने एकत्र येऊन काही चांगल्या गोष्टी काम करण्याचा प्रयत्न आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

“माहीम किल्ला. वरळी किल्ला ही ठिकाणं चांगली करण्याचा प्रयत्न आहे. जर कोणी चांगलं काम करत असेल तर आपणदेखील पाहावं असा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक दिवशी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. काय अडचणी आहेत वैगेर यांची माहिती घेतो. दरम्यान या कामांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छतेला महत्व देण्यात आलं असून झाडं तोडली जाणार नाहीत याचं कटाक्षाने पालन केलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव भिंती बाधल्याचं मी पाहिलं. त्या भिंती आदित्य ठाकरेंनी काडल्या असून रेलिंग लावलं आहे. फ्लायओव्हरच्या खाली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. सायकल ट्रॅक करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे”, असं कौतुक अजित पवारांनी यावेळी केलं.

“मास्कपासून अद्याप मुक्ती नाही”

“मंत्रिमंडळात मास्कपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही तोपर्यंत मास्क लावावाच लागेल असं मी याआधीही सांगितलं आहे. आमची जेव्हा कधी मंत्रिमंडळ बैठक होते तेव्हा काही चॅनेल अशा बातम्या चालवतात. अशा काही बातम्या चालवू नका. ज्यावेळी मास्क काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क ठेवायचा म्हणजे ठेवायचा,” असं अजित पवारांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्रदयनाथ मंगेशकरांना नोकरीवरुन काढल्याचा दावा केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “या गोष्टीला फार महत्व देऊ नये. लतादीदी गेल्यानंतर असे मुद्दे आपण उकरुन काढतो. देशात, महाराष्ट्रात हा विषय महत्वाचा आहे की इतर विषय महत्वाचे आहेत याचा विचार केला पाहिजे. एकमेकांच्या विधानावर प्रतिक्रिया देऊन लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यापेक्षा कोस्टल रोडचं काम, अर्थसंकल्प, पायाभूत सुविधा अशा गोष्टी महत्वाच्या आहेत”.