राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रा कारशेडवरील स्थगिती उठवल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका अशी विनंती करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं असून फक्त अहंकारासाठी कांजूरचा आग्रह करण्यात आला होता अशी टीका केली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आरेमध्ये कारशेडसाठी एकही झाड कापणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

मेट्रो कारशेड आरेतच !; नव्या सरकारचा ठाकरे यांच्याविरोधात पहिला निर्णय

“कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्या जागेवरुन वाद सुरु असून, हायकोर्टात प्रकरण सुरु आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो तीनसाठी मागितलेली आहे. तर कांजूरमार्गची जागा मेट्रो सहासाठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो तीनसाठी योग्य नाही असा अहवाल आमच्या काळातील कमिटीनेही केला होता. तसंच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांची उच्चस्तरीय समिती तयार केली होती, त्यांनीही कारशेडसाठी आरेमधील जागाच योग्य असल्याच स्पष्ट केलं होतं. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षांचा उशीर होईल असं समितीने सांगितलं होतं,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

विश्लेषण : आरे वरुन शिवसेना भाजपात पुन्हा कारे… मुंबईतील मेट्रो कारशेड प्रकरण चर्चेत, नेमकं घडलंय काय?

“मला वाटतं की त्यांनी (उद्धव ठाकरे) फक्त अंहकारासाठी कांजूरमार्गची मागणी केली. आम्हीदेखील वारंवार कांजूरची जागा रिकामी असती, तिचा वाद नसता तर खर्च करुनही कारशेड तिथे नेलं असतं. पण तिथे वाद सुरु आहे,” असं फडणवीस म्हणाले.

Aarey Colony: उद्धव ठाकरेंनी माझ्यावरचा राग मुंबईकरांवर न काढण्याचं आवाहन केल्यानंतर शिंदे म्हणाले, “जनतेच्या पैशांचं…”

“मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कारशेडचे २९ टक्के आणि एकूण प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून १५-२० हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे जनतेच्या खिशातील पैसे असून अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

“लवकरच खातेवाटप होईल”

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लवकरच खातेवाटप होईल, काळजी करु नका असं म्हटलं आहे. तुम्ही दिवसभरात अनेक वेळा खातेवाटप करत आहात, आम्ही पेपर फोडून टाकला तर तुम्हाला काम नाही मिळणार असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला.