मुंबई: यंदा प्रथमच जनगणना मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या ऑनलाइन स्वगणनेला राज्यात अल्प प्रतिसाद मिळाला. एकूण १२ लाख ६० हजार ९५० कुटुंबांनीच ऑनलाईन स्वगणना प्रक्रिया सुरू केली. यांपैकी ११ लाख १४ हजार २७७ कुटुंबांनी स्वगणना नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. पुण्यात सर्वाधिक १ लाख ५३ हजार कुटुंबांनी स्वगणना केली आहे. त्या खालोखाल मुंबई उपनगरात १ लाख २१ हजार, ठाण्यात १ लाख १६ हजार कुटुंबांनी नोंदणी केली आहे.
पुणे, ठाणे, मुंबई उपनगर या शहरी जिल्ह्यामध्ये जरी स्वगणनेचे आकडे जास्त असले तरी येथील लोकसंख्येच्या तुलनेत ऑनलाइन नोंदणीची संख्या फारच कमी आहेत. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण २.४४ कोटींहून अधिक कुटुंबे होती. यामध्ये ग्रामीण भागात सुमारे १.३२ कोटी आणि शहरी भागात सुमारे १.१२ कोटी कुटुंबे होती. त्यावेळी महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी होती.
ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यांनी घरगणनेच्या भेटीदरम्यान गणना कर्मचाऱ्याकडे आपला एच अक्षराने सुरू होणारा ११ अंकी ‘स्वगणना ओळख क्रमांक’ (एस ई आयडी ) देणे आवश्यक आहे. यामुळे माहिती संकलनाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास मदत होईल.
ज्या कुटुंबांनी स्व-गणनेच्या सुविधेचा वापर केला नाही, किंवा ज्यांना ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता आली नाही, त्यांची नोंदणी गणनाकर्मचारी १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पार पाडतील.
काही जिल्ह्यांमध्ये झालेली स्व-गणना
आहिल्यानगर- २४ हजार ३६
अकोला – १५ हजार ६९२
अमरावती- ३६ हजार २२३
बीड- २० हजार ८६५
भंडारा- ७ हजार ७७७
बुलढाणा- २१ हजार ७११
चंद्रपूर- १० हजार ८९३
छ. संभाजीनगर- ३२ हजार २४२
मुंबई शहर – ६१ हजार २९५
कोल्हापूर- २३ हजार ५२४
नागपूर- ३७ हजार ५३४
नाशिक- ५२ हजार ६६७
सोलापूर – ३४ हजार ३१३
रत्नागिरी- ८ हजार ६३१
सातारा- २६ हजार ६५४
