मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशी नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच आता राज्य तंत्रशिक्षण मंडळातून (एमएसबीटीई) पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मनी, जपान आणि रशिया या देशांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊन परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
जर्मनी, जपान व रशिया यासारख्या देशांमध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. राज्यातील पदविका विद्यार्थ्यांना तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषा प्रशिक्षण मिळावे यासाठी एमसबीटीईकडून कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (सीआयआय) सहकार्य घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना भाषा कौशल्याचे ज्ञान मिळावे यासाठी सीआयआयच्या कौशल्य उत्कृष्टता केंद्रामार्फत ‘महाराष्ट्र-जर्मनी-जपान कुशल कामगार गतिशीलता’ हा उपक्रम एमएसबीटीईकडून राबविण्यात येणार आहे.
एमएसबीटीई उपलब्ध करणार पायाभूत सुविधा
या उपक्रमाचा मुख्य भर प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य समन्वयावर असणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या उपक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आहे. यामध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि नेटवर्किंग सुविधांचा समावेश असणार आहे. तसेच, धोरणात्मक देखरेख आणि प्रशिक्षण उपक्रमांची प्रभावी अमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समन्वय साधला जाणार आहे.
परदेशातील नोकरीच्या संधी पुढाकार
विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते. यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसबीटीई आणि सीआयआयच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे राज्यातील तंत्रशिक्षण महामंडळातून पदविका शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले होण्यास मदत होईल. तसेच त्यांच्या परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
