मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानमधील ३ वर्ष पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १९ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयातील पदविका, बी.एस्सी, पदवी किंवा डिप्लोमा इन व्होकेशनल (डी.व्होक) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २० जुलैपर्यंत अर्जांची पडताळणी होणार असून, २२ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यावरील हरकती २३ ते २५ जुलैदरम्यान स्वीकारल्या जातील, तर अंतिम गुणवत्ता यादी २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ५९ हजार ४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थांमधून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणत्याही शाखेत किमान ४५ टक्के गुणांसह किमान तीन वर्षांचा किंवा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, बीएस्सीला किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले आणि मान्यताप्राप्त तीन वर्षांचा डिप्लोमा इन व्होकेशनल अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांला प्रवेश घेता येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज भरणे व सादर करणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ई-पडताळणी व प्रत्यक्ष पडताळणीद्वारे कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे.