मुंबई : रेखाकला आणि उच्चकला परीक्षांचे शुल्क तब्बल १४ वर्षांनंतर वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २०१२ पासून या परीक्षांच्या शुल्कात वाढ करण्यात आलेली नव्हती. आता २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून विविध परीक्षा, सेवा शुल्क तसेच गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या बक्षिसांच्या रकमेत सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे काही परीक्षांचे शुल्क जवळपास दुप्पट झाले. दुसरीकडे गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

कला संचालनालयामार्फत यापूर्वी घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला (एलीमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) तसेच शासकीय उच्चकला परीक्षांचे आयोजन २०२४-२५ पासून महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३नुसार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

इंटरमिजिएटचे शुल्क ९६० वरून १,४५० रुपये

उच्चकला परीक्षेतील मूलभूत अभ्यासक्रमाचे शुल्क ४४० रुपयांवरून ७०० रुपये, कला शिक्षक पदविकेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे शुल्क अनुक्रमे ६२० व ६४० रुपयांवरून ९५० रुपये करण्यात आले आहे. कला शिक्षणशास्त्र पदविकेचे शुल्क १,०४० वरून १,६०० रुपये करण्यात आले आहे.

रेखा व रंगकला, उपयोजित कला तसेच शिल्पकला व प्रतिमानबंध या इंटरमिजिएट अभ्यासक्रमांचे शुल्क प्रत्येकी ९६० रुपयांवरून १,४५० रुपये करण्यात आले आहे. तर याच विषयांच्या पदविका अभ्यासक्रमाचे शुल्क १,४१० रुपयांवरून २,१५० रुपये करण्यात आले आहे.

एलीमेंटरीचे शुल्क दुप्पट

शासकीय रेखाकला परीक्षेतील एलीमेंटरी ग्रेड परीक्षेचे शुल्क महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ५० रुपयांवरून १०० रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क २०० रुपये असेल. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचे शुल्क महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी १०० रुपयांवरून २०० रुपये, तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये करण्यात आले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना मोठे बक्षीस

शुल्कवाढीबरोबरच एलीमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.

एलीमेंटरी परीक्षेत गुणवत्ता यादीतील पहिल्या २० विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रत्येकी २५० रुपये मिळत होते. आता त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतील. २१ ते ४० क्रमांकासाठीचे बक्षीस २०० रुपयांवरून दीड हजार, तर ४१ ते १०० क्रमांकासाठीचे बक्षीस १५० रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आले आहे. प्रत्येक विषयासाठी देण्यात येणारे बक्षीसही १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आले आहे.

इंटरमिजिएट परीक्षेतील पहिल्या २० विद्यार्थ्यांचे बक्षीस ३५० रुपयांवरून तीन हजार, २१ ते ४० क्रमांकासाठी ३०० रुपयांवरून अडीच हजार आणि ४१ ते १०० क्रमांकासाठी २५० रुपयांवरून दोन हजार रुपये करण्यात आले आहे. प्रत्येक विषयासाठीचे बक्षीस १५० रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आले आहे. परिणामी इंटरमिजिएट परीक्षेतील एकूण बक्षिसांची रक्कम ५६ हजारांवरून ४ लाख २० हजार रुपये होणार आहे.

दुय्यम गुणपत्रिकेसह विविध सेवाही महाग

परीक्षांशी संबंधित विविध सेवांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. दुय्यम गुणपत्रिकेचे शुल्क २० रुपयांवरून १०० रुपये, उच्चकला परीक्षेच्या दुय्यम प्रमाणपत्राचे शुल्क ५० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. रेखाकला परीक्षेतील गुणांची पडताळणी २० रुपयांवरून १०० रुपये, तर रेखाकला परीक्षेतील ग्रेड पडताळणीचे शुल्क ६० रुपयांवरून १०० रुपये करण्यात आले आहे.

नावातील दुरुस्ती, गुणपत्रक पडताळणी, प्रतिलेख (ट्रान्सक्रिप्ट), पात्रता प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठीही नव्याने शुल्क निश्चित करण्यात आले आहे.