मुंबई : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा मिळणार असला, तरी या सवलतीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काही अटी व शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्याच परीक्षेला दुसऱ्यांदा बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही शुल्कमाफी मिळणार नाही. तसेच शहरात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या व गावात शेतजमीन असणाऱ्या नागरिकांच्या पाल्यांनाही शुल्कमाफी मिळणार नाही.

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सवलतीसाठी सुमारे २० लाख ३८ हजार ६३० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देताना अन्य शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या लाभांचाही विचार केला जाणार आहे.

यापूर्वीच अन्य योजनेतून शंभर टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्कमाफीचा लाभ दिला जाणार नाही. त्याच परीक्षेला दुसऱ्यांदा किंवा रिपीटर म्हणून बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सवलतीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय, पालक शहरात राहून नोकरी वा व्यवसाय करीत असले व त्यांच्या नावावर गावात शेतजमीन असलेल्या विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफी मिळणार नाही.

अंशतः सवलत मिळालेल्यांना दिलासा महाडीबीटी पोर्टलवरील शासकीय योजनांमधून मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना यापूर्वीच ५० किंवा १०० टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळाली असल्यास, त्याची माहिती कला परिसंस्थांना द्यावी लागणार आहे. आधी ५० टक्के सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित ५० टक्के शुल्कमाफी देण्यात येईल. त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला एकाच लाभाची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कमाफीची तरतूद करताना पात्र विद्यार्थ्यांनाच लाभ मिळावा, यावर विभागाने भर दिला आहे. कला परिसंस्थांनी विद्यार्थ्यांचे सविस्तर प्रस्ताव मागवून त्यातील माहिती, योजनेचे निकष आणि पात्रता तपासल्यानंतरच शुल्कमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ दुष्काळग्रस्त तालुक्यातील रहिवासी असणे पुरेसे ठरणार नसून, संबंधित अटींची पूर्तता करणे आवश्यक असेल.