मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलस्रोतांमधून अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. नदी, तलाव आणि सिंचन प्रकल्पांतून शेतीसाठी पाणी उपसणारे कृषी पंप जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. पंपासाठी वापरण्यात येणारी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईमुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. कारवाईविरोधात शेतकरी लोकप्रतिनिधींकडे धाव घेत असून लोकप्रतिनिधीं बरोबर वाद होत आहेत. ग्रामीण भागातील आमदारांची शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड देताना नाकीनऊ होत असल्याचे एका मंत्र्याने सांगितले.
सातारा जिल्ह्यात धोम आणि धोम-बलकवडी धरणांतील पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जूनमध्ये पाणी उपसाबंदी लागू करण्यात आली होती. कराड येथे शेतकरी संघटनांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. नागठाणे येथे उपसाबंदीविरोधात चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला. उभी पिके, जनावरांचा चारा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.
बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातील अप्पर कुंडलिका मध्यम प्रकल्पातून परवानगीशिवाय पाणी उपसा केल्याप्रकरणी ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कैज तालुक्यातील अरणवाडी साठवण तलाव परिसरातही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातील पेडगाव मळई तलावातून पाणी उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
अकोला जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात नवीन विहीर किंवा कूपनलिका खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमरावतीतही भूजल उपशावर निर्बंध घालून अनधिकृत पंप जप्ती आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या ४१९ तलावांतून पाणी उपशावर बंदी घालण्यात आली. अहिल्यानगरमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांभोवती एक किलोमीटरच्या परिसरात अवैध उपसा रोखण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
पंप जप्त झाल्यानंतर शेतकरी आमदार-खासदारांकडे धाव घेत आहेत.अधिकाऱ्यांना फोन करून पंप परत देण्याची विनंती किंवा सूचना केली आहे. लोकप्रतिनिधींच्या घरासमोरील ठिय्या आणि पंप परत करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन विनंती करावी लागत आहे. त्यामुळे एकीकडे शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे तर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या रोषाचे बळी पडू नये यासाठी जिल्हाधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. शेती आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंप लावून शेतकरी पाणी उपसा करीत आहेत.पाणीटंचाईवरील उपाययोजनांमधून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
