मुंबईः राज्याला येत्या काळात एल-निनोचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याच्या शक्यतेने राज्य सरकारची झोप उडाली असतानाच यंदा मान्सूचे आगमनही २० जूनपर्यंत लांबणीवर पडणार आहे. त्यातच मे-जून दरम्यान उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही देण्यात आल्याने सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यातील पाऊसपाणी तसेच मान्सून तयारीचा आढावा घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन विभागाने राज्यातील परिस्थितीची माहिती देताना जानेवारी ते एप्रिल दरम्यान वळीवाच्या पाऊसामुळे वीज पडून, भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला असून १६० प्राणी दगावले. गेल्या आठवड्यात वीज पडून तीघांचा मृत्यू तर तीन जन जखमी झाल्याची तसेच ८ प्राणी दगावल्याची माहिती दिली. तसेच गेल्या काही माहिन्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे बाधित झालेल्या २ लाख ४९ हजार ३९१ शेतकऱ्यांना १८४कोटी २३ लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
एल-निनोमुळे यंदा राज्यावर गंभीर संकट ओढवण्याची भिती व्यक्त केली जात असून मंत्रिमंडळ बैठकीतही त्यावर गंभीर चर्चा झाली. यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाने केलेल्या सादरीकरणावरुन संपूर्ण मंत्रिमंडळच स्तब्ध झाले. राज्यावर यंदा एलनिनोचा सर्वात गंभीर परिणाम होणार असून सरासरीपेक्षा कमी म्हणजेच सुमारे ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच सन २०२६च्या मध्य ते उत्तारार्धात एल निनोसोबतच मध्यम ते तीव्र सकारात्मक आयओडी Indian Ocean Dipole(IOD) विकसित होण्याचा अंदाज आहे.
अलनिनोमुळे जीथे भारतीय मान्सून दडपतो,तिथे सकारात्मक आयओडी भारतातील काही भागांमध्ये पर्जन्यमान वाढवू शकतो. मात्र अलनिनो आणि आयओडी यांच्या एकत्रित परिणामांचा विचार केल्यास काही भागात पर्जन्य वितरणाबाबत म्हणजेच पाऊसाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण होते. राज्यात अल निनो आणि आयओडी एकाचवेळी येत असल्याने त्याचे चांगल्यापेक्षा वाईट परिणाम अधिक होण्याची भिती मंत्रिमंळात व्यक्त करण्यात आली.
तसेच जुलै ते सप्टेंबर दरम्यान टप्या टप्याने पाऊस कमी होणार आहे. त्यातच पावसाळ्यादरम्यानच एलनिनो विकसित होत असल्याने ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान सर्वाधित गंभीर परिणाम राज्यात दिसून येतील. विदर्भ- मराठवाड्यात तीव्र उष्णतेसह दुष्काळाचा गंभीर धोका असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यामुळे संभाव्य दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
