मुंबई : राज्यात मोसमी पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकृत पंचनामे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असले तरीही टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी होईल.

राज्यात मोसमी पावसाने ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम अडचणीत आला असून, लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आपत्ती निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार दुष्काळी स्थितीचे पंचनामे पाच ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामीण भागातील सर्वच मंत्र्यांनी पावसाअभावी खरीप हंगामाची स्थिती अत्यंत नाजूक आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली आहेत. कमी दिवसांत येणारी मूग, मटकी, चवळी सारखी कडधान्य पिके वाया गेली आहेत. सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी पिकांची काढणी करून काही हाती लागेल, अशी स्थिती नाही. ऊस पिकाची वाढ खुंटली आहे. उसाच्या नव्या लागणी पाण्याअभावी अडचणीत आल्या आहेत.

लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे, अशी एकमुखी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

कर्जत, शिरूरमध्ये ४३ दिवसांपासून पाऊस नाही

यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात जूनमध्ये पाऊस सक्रीय झाला नव्हता. जुलैमध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे पेरण्यांनी सरासरी गाठली. धरणे भरली. पण, ऑगस्टपासून सप्टेंबरमध्यापर्यंत पावसाने मोठी ओढ दिली आहे. एकूण २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत ३० दिवसांपर्यंत पावसाचा खंड पडला आहे. उत्तर महाराष्ट्रात ३१, पश्चिम महाराष्ट्रात १७, मराठवाड्यात १६, विदर्भात २२, असा एकूण ८६ तालुक्यांत पावसाचा खंड पडला आहे. आहिल्यानगरमधील कर्जत आणि पुण्यातील शिरूरमध्ये ४३ दिवसांहून जास्त खंड पडला आहे, तर खामगाव (बुलढाणा), संगमनेर (आहिल्यानगर), परांडा (धाराशिव), देवळाली, कळवण (नाशिक), इंदापूर (पुणे), फलटण (सातारा) आणि माळशिरस (सोलापूर) येथे ४० दिवस खंड पडला आहे. ३० दिवसांहून जास्त खंड पडलेले तालुके २७ असून, २५ ते ३० दिवस खंड पडलेले तालुके २६ आहेत.

कृषिमंत्री सोमवारपासून पाहणी दौऱ्यावर

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोमवारपासून मराठवड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पाहाणी करतील. दुसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पाहणी करणार आहेत. पावसाअभावी खरीप पिके अडचणीत आली आहेत. शेतकरी हवालदील झाला आहे. यंदा कोकणापासून – विदर्भापर्यंत सर्वच विभागांत पिके करपू लागली आहेत. पावसाने जास्त ओढ दिलेल्या ठिकाणी खरीप पिकांसह, फळबागांची पाहणी करणार आहोत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

राज्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. अनेक ठिकाणी महिनाभर पाऊस पडला नाही. टंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने सुरू केल्या जातील. एनडीआरएफच्या निकषांनुसार पाच ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू होतील. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.