मुंबई : राज्यातील टंचाईग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने होत आहे. लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा केला जात आहे. अशा टंचाईग्रस्त भागात १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. प्रत्यक्ष पाहणीत ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती दिसून येईल, अशा तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये वाढ होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई निवारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सन २०२४ – २५ आणि २०२५ – २६ मधील कामांचा प्रलंबित निधी येत्या १५ दिवसांत सर्व जिल्हा परिषदा आणि जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करावा. तसेच सन २०२५ – २६ मधील विहीर अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. दुष्काळी भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारण विभागासह कृषी व अन्य संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे. एकाच कामाची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेऊन उपलब्ध निधी दुष्काळ निवारणाशी संबंधित कामांकडे वळवावा, असे निर्देशही दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
रोजगार हमीच्या दरात वाढ होणार
व्हीबी-जीरामजी योजनेतील अकुशल मजुरांच्या दरांचा पुनर्विचार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने दरवाढीबाबत निर्णय घेऊन पुढील दहा दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश समितीने मुख्य सचिवांना दिले आहेत, त्यानुसार रोजगार हमीच्या मजुरीत वाढ होणार आहे. गाळपेरा जमिनीवर रोजगार हमी योजनेतून मका, ज्वारी आणि बाजरीची लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तलावांतील गाळ काढणे आणि खोलीकरणाच्या कामांत अनियमितता झाली असेल, तेथे आवश्यक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
फळबागा वाचविण्यासाठी मदतीचा स्वतंत्र प्रस्ताव
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील फळबागा वाचविण्यासाठी पाणी आणि अनुदानाची आवश्यकता असून, संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी मदत मिळावी, अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केली. त्यावर मदतीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाकडून मदत उपलब्ध न झाल्यास राज्य शासनामार्फत मदत देण्याबाबत मुख्य सचिवांनी अभ्यास करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
