मुंबई : सध्याची जागतिक अस्थिर परिस्थिती आणि आर्थिक मंदी यामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच कोसळलेले दुष्काळाचे संकट यामुळे राज्याच्या तिजोरीवरील वाढता ताण लक्षात घेऊन विभागांच्या निधी खर्चात २० टक्के कपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यानुसार सर्व विभागांनी केवळ अत्यावश्यक खर्चाचाच विचार करावा, किमान २० टक्के निधी वाचवावा अशा सूचना वित्त विभागाने दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधिकार्यांनी विभागाच्या निधीचा सदसद्विवेक बुद्धीने वापर करण्याच्या सूचना सचिवांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यास वस्तू आणि सेवाकर, राज्य उत्पादन शुल्क, मुद्रांक आणि नोंदणी शुल्क तसेच वाहन कराच्या माध्यमातून मिळणार्या महसुलातही काही प्रमाणात घट झाली आहे. तर दुसरीकडे विविध लोकप्रिय योजना आणि विकासकामांवरील खर्चांत वाढ होत आहे. परिणामी राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असतानाच दुष्काळी परिस्थितीमुळे वित्त विभागासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. राज्यावरील दुष्काळी संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून आतापर्यंत ३०४ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी काही तालुक्यांची भर पडणार आहे. दुष्काळग्रस्त सुमारे सव्वा कोटी शेतकर्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये याप्रमाणे पाच- सहा हजार कोटींची मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मुळातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे सरकारचे आर्थिक गणित कोलमडून पडले असतानाच शेतकर्यांच्या वाढत्या दबावानंतर सरकारने शेतकर्यांसाठी ३४ हजार कोटींची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यानंतर आता दुष्काळ निवारणासाठी मोठ्याप्रमाणात निधीची आवश्यकता असून त्याची व्यवस्था करण्यासाठी वित्त विभागाने विविध पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच वित्त विभागाने सर्व विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन राज्याच्या आर्थिक परिस्थितीची त्यांना कल्पना देताना प्रत्येक विभागांनी किमान २० टक्के खर्चात कपात करण्याची सूचना केली. त्यावर राज्यावरील दुष्काळी संकट गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी, जाहिरातबाजी, नव्या योजनांसाठीचा निधी खर्च न करता तो दुष्काळी कामासाठी वापरता येईल. शिष्यवृत्ती, शालेय पोषण आहार, आरोग्य, शिक्षण यावरील खर्चात कपात केल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची भीती काही अधिकार्यांनी वित्त विभागाच्या निदर्शनास आणली. यामुळेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसारख्या लोकप्रिय योजनांच्या तरतुदीत कपात केली जाणार नाही.
दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे याचा अंदाज येईल. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून भरीव मदत मिळण्याची अपेक्षा आहे. एकदा दुष्काळ निवारणाच्या आर्थिक भाराचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आर्थिक निर्बंधाबाबत अंतिम निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
’राज्याच्या तिजोरीवर
आर्थिक ताण लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खर्चावर बंधने आणण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या आहेत. याबाबत त्यांनी सर्व विभागाच्या सचिवांशी चर्चा केली आहे.
’अनावश्यक खर्च थांबवा. शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती, ‘लाडकी बहीण’यांसारख्या योजना आणि विविध शिष्यवृत्ती यांवरील निधीत कपात न करता नवीन विकास कामे, रस्ते, सिंचन प्रकल्प यांवरील
खर्चात कपात करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्याचे समजते.
’राज्यातील दुष्काळी संकटाचा विचार करून प्रत्येक विभागप्रमुखांनी काटकसरीचे धोरण स्वीकारावे, अनावश्यक खर्च टाळावा आणि हा निधी जलसंधारण, पाणी, चारा या योजनांसाठी वापरावा, सचिवांनी सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.
