मुंबई : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतर मंत्रालयीन पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. पथक अकरा ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहे. पाऊस, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल पथकाचे प्रमुख आहेत. केंद्र शासनाच्या कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि अन्य संबंधित विभागांतील प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे.
पथकासमोर दुष्काळी स्थितीचे सादरीकरण
सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय पथकातील सदस्यांबरोबर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. अग्रवाल यांनी पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील काही भागांत निर्माण झालेली पाणी टंचाई, टॅकरची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता आणि शेतकरी आत्महत्या या बाबींकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले. मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंगल यांनी राज्यातील पावसाची स्थिती, अल निनोमुळे हवामान आणि पावसावर झालेले परिणाम तसेच शेती पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.
कृषी विभागाच्या वतीने सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सुरज मांढरे यांनी राज्यातील पिकांच्या नुकसानीची आणि जिल्हानिहाय परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती केंद्रीय पथकासमोर मांडली. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन, भूजल सर्वेक्षण व विकास आयुक्त रवींद्र खेबुडकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, रोजगार हमी योजनेचे सचिव अप्पासाहेब धुळाज आदींनी आपआपल्या विभागाचे सादरीकरण केले. आगामी सात महिन्यांतील संभाव्य परिस्थितीची माहिती दिली.
अहिल्यानगर, सोलापूरमध्ये करणार पाहणी
केंद्रीय पथक आज, शुक्रवारी अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर, कर्जत तालुक्यांत बाजरी, तूर आणि सोयाबीन पिकाची पाहणी करेल. शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला तालुक्यांत डाळिंब, ऊस, मका, तूर पिकांसह पाणी टंचाई, टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्याची आणि रोजगार हमीच्या कामाची पाहणी करणार आहे.
