मुंबई: गेल्या दोन दशकात राज्यावर तब्बल आठवेळा दुष्काळी संकट कोसळले असून त्यातून कृषी क्षेत्राला विशेषत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने वेळोवेळी भरघोस मदत दिली आहे. त्याच धर्तीवर यावेळीही शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार असून त्यासाठी केंद्राकडे तब्बल ५ हजार ३०० कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पहिल्या टप्यात २६५ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असून आणखी ३७ तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळामुळे राज्याच्या सकल उत्पादनात महत्वाची भूमिका बजावणारे कृषी क्षेत्र यंदा मोठ्या संकटात असून या क्षेत्राला सावरण्यासाठी गेल्या दीड वर्षात विविध माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल २२ हजार ११० कोटींची मदत करण्यात आली आहे.
वातावरणीय बदलामुळे गेल्या दोन दशकात राज्यावर तब्बल आठवेळा दुष्काळाचे संकट आले असून प्रत्येकवेळी सरकारने मदत करीत बळीराजाला दिलासा दिला आहे. याच धर्तीवर यंदाही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ५ हजार ३०० कोटींच्या मदतीचा प्राथमिक प्रस्ताव पाठविला असून एनडीआरएफच्या निकषा पलिककडे जाऊन विशेष बाब म्हणून राज्यासाठी विशेष मदत पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्राचे पथक राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर होईल . त्यानंतर दोन्ही प्रस्तावांचा आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करेल. त्याचवेळी राज्य सरकारनेही मदतीची तयारी सुरु केली असून त्याची आखणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात आता दुष्काळ पडला असला तरी जुलै- ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेही शेतपिकांचे नुकसान झाले. त्यासाठी शेतकऱ्यांना ८८८ कोटींची मदत वाटप करण्यात आली असून अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी ५७० कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने केलेली मदत
सन दुष्काळाची व्याप्ती मदत
२००३ ११ जिल्हयातील ७१ तालुके ११५०.९३ कोटी
२००४ २३ जिल्हयातील ९ हजार ३९७ गावे
२०१२ राज्यभरातील २४५ तालुके २२१४ कोटी
२०१४ २२ जिल्ह्यातील १९ हजार ५९ गावे १९६२. ९९ कोटी
२०१५ राज्यभरातील विविध प्रभावित गावे ३०४९ कोटी
२०१८ २६ जिह्यातील १५१ तालुके ४९०९ कोटी
२०२३ १५ जिल्हयातील ४० तालुके २४४३ कोटी
