मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सिंचनासाठी आणि ग्रामीण भागात योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) मधून प्रत्येक जिल्ह्यासाठी तब्बल २० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यातील३०२ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत वीजे अभावी शेतकऱ्यांची पिके वाया जावू नयेत यासाठी वीज वितरण व्यवस्था सक्षम ठेवण्याठी वितरण रोहित्र( ट्रान्सफाॅर्मर), ‘स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर’ आणि ‘कॅपॅसिटर बॅँक’ खरेदी करण्यासाठी डीपीडीसीतून प्रत्येक जिल्ह्यासाठी २० कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि ग्रामीण भागात योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणाचे कामे युद्धपातळीवर सुरु होणार आहे.
दुष्काळच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून राज्यात सुमारे ४७ लाखांवर कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत हा वीजपुरवठा सुरळीत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक असल्याने सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून नवीन वितरण रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर्स) खरेदी केली जाणार असून त्याद्वारे अतिभारित (ओव्हरलोड) किंवा नादुरुस्त रोहित्र बदलून सिंचनातील अडथळे दूर करण्यात येणार आहेत. यासोबतच कृषी वीजवाहिनीवर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना आणि शेतातील घरांना २४ तास सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यकतेनुसार सिंगल फेज आणि थ्री-फेजचे नवीन स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार आहेत. तसेच लांब अंतराच्या वीजवाहिन्यांवर कमी दाबाने वीजपुरवठा होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करून योग्य दाबाने व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन कपॅसिटर बँक बसविले जाणार आहेत.
वीजयंत्रणेच्या या सर्व कामांची युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हावी यासाठी महावितरणच्या संबंधित अधीक्षक अभियंता कार्यालयामार्फत सर्व तांत्रिक बाबींची तात्काळ तपासणी करुन वीजयंत्रणेच्या स्थानिक गरजांनुसार आवश्यक अंदाजपत्रके तयार करून ती तत्परतेने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टळावे आणि पिकांना वेळेवर पाणी देता यावे यासाठी या अंदाजपत्रकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने प्रशासकीय मान्यता देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
