मुंबई: केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने तातडीच्या उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांची आखणी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन केला आहे. महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून, राज्यातील तसेच अन्य राज्यांमध्ये यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांचा अभ्यास करून दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाला शिफारसी करण्यात येणार आहेत.
दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. या उपसमितीची २९ सप्टेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ६ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
या अभ्यासगटात वित्त, नियोजन, ऊर्जा, वने, मदत व पुनर्वसन, सहकार, मृद व जलसंधारण, जलसंपदा, कृषी, ग्रामविकास आणि पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून उपाययोजनांचा विचार केला जाणार आहे.
अभ्यासगटाला राज्यात यापूर्वी करण्यात आलेल्या तसेच अन्य राज्यांत राबविण्यात येत असलेल्या चांगल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या उपाययोजनांचा महाराष्ट्राच्या परिस्थितीनुसार वापर कसा करता येईल, याबाबत शिफारसी करण्यात येणार आहेत.
दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने अभ्यासगटाच्या कामात चारा नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. उपलब्ध चारा, भविष्यात अपेक्षित असलेले चाऱ्याचे उत्पादन आणि पुढील काळातील गरज लक्षात घेऊन चारा नियोजन करण्याचे निर्देश अभ्यासगटाला देण्यात आले आहेत.
याशिवाय दुष्काळाशी संबंधित अन्य अनुषंगिक बाबींचाही अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. विषयाच्या गरजेनुसार अन्य विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अभ्यासगटाच्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याची मुभा देण्यात आली आहे.
तातडीच्या मदतीपलीकडे जाऊन दुष्काळाच्या परिणामांवर दीर्घकालीन उपाय शोधण्याच्या दृष्टीने या अभ्यासगटाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. आता या अभ्यासगटाच्या शिफारशींमधून राज्यातील दुष्काळ व्यवस्थापनासाठी कोणत्या ठोस उपाययोजना पुढे येतात, याकडे लक्ष लागले आहे.
