मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाची स्थापना केली आहे. कृषी व किसान कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील हे पथक लवकरच महाराष्ट्राचा दौरा करून दुष्काळाची तीव्रता, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या पाहणीनंतर पथक केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे.त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एन डी आर एफ) तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एस डी आर एफ) अंतर्गत मदतीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे दुष्काळाबाबत अंतरिम अहवाल सादर करून एन डी आर एफ अंतर्गत मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या रबी हंगामाच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांच्या अडचणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक तातडीने पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.
या पथकात केंद्र शासनाच्या विविध १० महत्त्वाच्या विभागांचे प्रतिनिधी सहभागी असतील. वित्त विभाग, नीती आयोग, कृषी विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सार्वजनिक वितरण व अन्न विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, ग्रामविकास विभाग, जलशक्ती मंत्रालय, महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पीक विभागाचा त्यात समावेश आहे.
राज्य शासनाच्या २६ सप्टेंबर च्या शासन निर्णयानुसार २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ८० टक्के भागावर दुष्काळाचे सावट असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक राज्य शासनाच्या समन्वयाने दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०२०च्या निकषांनुसार दुष्काळाची तीव्रता तपासली जाणार आहे. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, पशुधनावरील परिणाम आणि अन्य संबंधित बाबींचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना एन डी आर एफ आणि एस डी आर एफ अंतर्गत मदत, तातडीच्या उपाययोजना तसेच भविष्यातील पुनर्वसनासाठी आवश्यक शिफारशी केंद्राला सादर केल्या जाणार आहेत.
केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने राज्याने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या स्थितीला केंद्रीय पातळीवरील प्रत्यक्ष पाहणीची जोड मिळणार आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.
