मुंबई : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळीजन्य स्थिती निर्माण झालेली असतानाही दूध संकलन मात्र स्थिर आहे. ऑगस्टमध्ये प्रति दिन संकलन १६१.४ लाख लिटर होते, सप्टेंबरमध्ये १६२.८२ लाख लिटरवर गेले आहे. सध्या दूध उत्पादन स्थिर असले तरीही चारा – पाण्याची कमरता जाणवून ऑक्टोंबर अखेरीपासून दूध संकलनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाची मोठी तूट मराठवाडा आणि विदर्भात निर्माण झाली आहे. पण, या भागात फारसे दुग्ध उत्पादन होत नाही. राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यापैकी सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात म्हशीच्या दुधाचे प्रमाण जास्त आहे, तर पुणे, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगरमध्ये गाईच्या दुधाचे प्रमाण जास्त आहे.
व्यावसायिक पशुपालक, शेतकरी जनावरांच्या चाऱ्याची तजवीज करतात. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा तत्काळ परिणाम दुग्ध उत्पादनावर दिसून येणार नाही. पण, ऑक्टोंबरअखेरपासून पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन दूध उत्पादन, संकलनात घट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये प्रति दिन सुमारे १६२.८२ लाख लिटर दूध संकलन होत आहे. त्यात सहकारी क्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ३५.९४ लाख लिटर, तर खासगी क्षेत्राकडून १२६.८८ लाख लिटर दूध संकलन केले जाते.
सध्यातरी दुधाचा तुटवडा नाही – कुतवळ
राज्यातील दूध उत्पादन, संकलन स्थिर आहे. सध्यातरी कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवत नाही. त्यामुळे पिशवी बंद दूध, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, मागणीही स्थिर आहे. पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. शेतकरी चारा – पाण्याची तजवीज करतात. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा तातडीने परिणाम दिसून येणार नाही. डिसेंबरनंतर काही प्रमाणात दूध संकलनात घट येण्याची शक्यता असली तरीही फार तूट निर्माण होईल, अशी माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.
