मुंबई : राज्य सरकारने दुष्काळ बाधित ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी पाच रुपयांची अग्रीम मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शेतकरी ओळख क्रमांक काढलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर पाच हजार रुपयांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारपर्यंत मदत वितरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ई – केवायसी नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी ई – केवायसी पूर्ण करताच मदत वितरण केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली.
त्यांनी ई- केवायसी पूर्ण करावी लागणार
मदत वितरणासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, याद्या तयार करणे व लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा प्रत्येक तहसीलदारांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. सुरुवातीला शेतकरी ओळख क्रमांक काढलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रीम जमा होईल. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक काढला नाही, त्यांनी ई- केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. ई – केवायसी पूर्ण होताच मदत जमा होईल.
बार्शी तालुक्याची आघाडी
राज्यातील ३०४ तालुक्यांच्या स्तरावर ही प्रक्रिया सुरू आहे. बार्शी तालुक्याने यात आघाडी घेतली असून, प्रायोगिक तत्त्वावर बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावात प्रायोगिक तत्त्वावर दहा खातेदारांना मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे बार्शी पहिला लाभार्थी तालुका ठरला आहे. लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे, पोर्टलवर याद्या तयार करणे, माहितीची पडताळणी करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करून काम वेळेत पूर्ण करणे, यासाठी महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.
दिवाळीपूर्वी मदत देणार
दिवाळीपूर्वी दुष्काळी तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. मदतीचे पैसे कोणत्याही बँकेने कापून घेऊ नयेत, अशी सक्त सूचनाही दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.
