मुंबई : राज्य सरकारकडून दुष्काग्रस्त भागातील पशुधनासाठी चारा खरेदी करण्यात येणार आहे. या चारा खरेदीचा दर सरकारने निश्चित केला असून सुका चारा आणि मुरघास यांच्या खरेदीसाठी अनुक्रमे प्रतिकिलो कमाल १२ रुपये आणि ८ रुपये अशी आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. या दरांमध्ये वाहतूक खर्चाचा समावेश नसून तो स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. सन २०२६-२७ मधील दुष्काळाच्या कालावधीसाठी हे दर लागू राहणार आहेत.
राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने चारा खरेदीविषयी शासन निर्णय जारी केला आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी शासनाने चारा खरेदी करताना गुणवत्तेचे निकषही निश्चित केले आहेत. सुक्या चाऱ्यातील ओलाव्याचे प्रमाण कमाल १५ टक्के असावे. चारा चांगल्या दर्जाचा, आंबट किंवा कुबट वास नसलेला तसेच बुरशी, माती आणि किडींपासून मुक्त असणे आवश्यक आहे. सुक्या चाऱ्यासाठी ज्वारी आणि बाजरीला प्राधान्य देण्यात आले आहे.
चाऱ्यासंदर्भातील निकष निश्चित
मुरघास खरेदी करताना तो हवाबंद अवस्थेत असणे आवश्यक आहे. त्याला बुरशीचा प्रादुर्भाव नसावा. मुरघासातील ओलाव्याचे प्रमाण ६२ ते ७० टक्के, सामू (पीएच) ३.५ ते ४.४ आणि क्रूड प्रोटीनचे प्रमाण किमान नऊ टक्के असणे आवश्यक आहे. तसेच क्रूड फायबरचे प्रमाण कमाल ३५ टक्के किंवा एनडीएफचे प्रमाण ६० टक्के, अफ्लाटॉक्सिन बी कमाल २० पीपीबी असावे, आदी निकष जारी करण्यात आले आहेत.
तपासणीसाठी सहा प्रयोगशाळा
सुका चारा आणि मुरघासातील घटकांची गुणवत्ता तपासण्यासाठी शासनाने सहा प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पुण्यातील गोखलेनगर येथील पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा, औंध येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राज्यस्तरीय रोग अन्वेषण संस्था, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा, गुजरातमधील आनंद येथील एनडीडीबीची काफ प्रयोगशाळा, बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल न्यूट्रिशन अँड फिजिऑलॉजी आणि शासनमान्य खाद्य विश्लेषण प्रयोगशाळांचा समावेश आहे.
