मुंबई : गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी संकलित केलेली माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. शेतकरी ओळख क्रमांक (अॅग्रीस्ट्रक) आणि आधार क्रमांक जोडणी केलेल्या बँक खात्यांची अद्ययावत माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. त्यामुळे पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त होताच फक्त आठ दिवसांत सर्व मदत वितरीत करू. दिवाळी पूर्वी मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या संख्येत वाढ होणार
लोकप्रतिनिधींकडून आपल्या मतदारसंघातील तालुके दुष्काळी करण्याची मागणी होत आहे. अशी मागणी आलेल्या तालुक्यांची प्रत्यक्ष पहाणी करून, संबंधित अहवाल दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संबंधित अहवालावर उपसमितीत चर्चा करून दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करणार आहोत. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असेही मकरंद जाधव म्हणाले.
दहा जणांचे केंद्राचे पथक करणार पाहणी
कृषी विभागाच्या सचिवांच्या वतीने राज्यातील दुष्काळी जिल्हे, तालुक्यांची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. दहा जणांचे पथक पुढील चार – पाच दिवसांत राज्याच्या दौऱ्यावर येईल. या पथकांची तीन गटांत विभागणी होईल. पहिले पथक छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत पाहणी करेल. दुसरे पथक अकोला, वाशिम, यवतमाळमध्ये आणि तिसरे पथक अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात पाहणी करेल. पथकाचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर येतील, अशी माहिती भरणे यांनी दिली.
