मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागानेही मदतीचा हात पुढे केला आहे. ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासोबतच तेथील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ऐतिहासिक बारवांच्या पुनरुज्जीवनासाठी सांस्कृतिक संचालनालय विभागाच्या निधीतून २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. राज्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे अनेक जिल्ह्यांत भूजलपातळी खालावली आहे. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक विभागाच्या विविध प्रकल्पांचा उपयोग दुष्काळ निवारणासाठी करण्याच्या सूचना शेलार यांनी दिल्या. राज्यात सुमारे २० हजार ऐतिहासिक व प्राचीन बारव (ऐतिहासिक जलसाठे) आहेत. त्यातील अनेक बारव गाळ व कचरा साचल्याने बुजलेल्या किंवा ढासळलेल्या आहेत. या बारवांची स्वच्छता, गाळ काढणे आणि जलस्रोत पुन्हा कार्यान्वित करण्याची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. सांस्कृतिक विभाग, रोजगार हमी योजना, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून ही कामे करण्यात येणार आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरीकडूनही काही निधी पुरातत्त्व विभागाला देण्यात येणार आहे.

पुरात्व संचालनालयाच्या अखत्यारित ३९० राज्य संरक्षित स्मारके आहेत. या स्मारकांवरील स्वच्छता, साफसफाई आणि देखभालीची कामे रोजगार हमी योजनेतून स्थानिकांना देण्याचा प्रस्ताव आहे. क्षेत्रफळानुसार पहारेकरी नियुक्त केले जाणार आहेत. याशिवाय इतर कामांतून दुष्काळग्रस्त भागात अंदाजे अडीच हजार रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे शेलार यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी महोत्सव निर्धारित कालावधीपुरते आणि साधेपणाने साजरे करावेत. उत्सव साजरा करण्यापेक्षा सांस्कृतिक अस्मिता जपणे महत्त्वाचे आहे. दुष्काळग्रस्त भागातील स्थानिक लोककलावंतांना प्राधान्याने मदत होईल, असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करणाऱ्या कलावंतांना मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमीचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील उपस्थित होत्या.