मुंबई : राज्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. सध्या विविध जिल्ह्यांतील गावांना आणि वाड्यांना ७६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ३७४ टँकर सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे. या जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत टँकरच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.
राज्यातील पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर या आठ जिल्ह्यांमध्ये मिळून ३७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १६९ टँकर सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांत या जिल्ह्यात टँकरच्या संख्येत शंभराने वाढ झाल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्येही पाणीटंचाई जाणवत आहे. या भागात १७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती उपलब्ध आहे. कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात १५ टँकर सुरू आहेत. त्यामुळे मराठवाड्याबरोबरच राज्याच्या अन्य भागांमध्येही पाणीटंचाईच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासलेली नाही.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसह नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नसल्याचे सांगण्यात आले. राज्यातील काही भागांत पाणीटंचाई अद्याप मर्यादित असली, तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक बनत आहे. पाणीसाठ्यातील घट, वाढती मागणी आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे आगामी काळात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन, उपलब्ध जलस्रोतांचा काटकसरीने वापर आणि टँकरद्वारे नियमित पुरवठा ही सरकार समोर प्रमुख आव्हाने ठरणार आहेत.
