मुंबई : राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत १४ कारखान्यांवर कारवाई करण्यात आली असून, आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली.

 शशिकांत शिंदे यांनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सतेज पाटील, अनिल परब, प्रविण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. गतवर्षी राज्यात चार हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. चौदा कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सरकारी वरदस्ताशिवाय हे शक्य नाही. महाराष्ट्र अंमली पदार्थांची राजधानी बनला आहे. पिढीच्या पिढी व्यसनांमुळे बरबाद होत आहे. सरकारने या प्रश्नावर कठोर कारवाई करून अंमली पदार्थांची तस्करी मोडून काढावी, अशी आग्रही मागणी सतेज पाटील यांनी केली. अनिल परब यांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

अंमली पदार्थाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना केली आहे. अंमली पदार्थांची संपूर्ण साखळी मोडून काढली जात आहे. अंमली पदार्थ साखळीतील मुख्य आरोपींसह त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीवरही कठोर कारवाई केली जात आहे. कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे, अशे कदम म्हणाले.

 सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात उघडकीस आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणात अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये किंवा ग्रामीण भागातील शेडमध्ये लपूनछपून अंमली पदार्थ तयार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिस आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अशा ठिकाणांवर तपास सुरू केला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.

निकृष्ट औषध कंपनीला १०० कोटींचा ठेका ?

पालघर येथील हिंदुस्थान लॅबॉरेटरी लिमिटेड या कंपनीने निकृष्ट औषध पुरवठा केला म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली होती. तपासणीत औषधे निकृष्ट असल्याचे आढळून आले होते. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची गरज होती. पण, तसे न करता त्याच कंपनीला आरोग्य विभागाने शंभर कोटी रुपयांचा औषध पुरवठ्याचे ठेका दिला आहे. हा ठेका का दिला आहे. कुणाच्या शिफारशीमुळे दिला आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी सतेज पाटील औचित्याच्या सूचनेद्वारे केली.