मुंबई: राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे लांबणीवर पडलेली विशेष सखोल पडताळणीची (एसआयआर) पूर्व तयारी निवडणूक आयोगाने राज्यात सुरू केली आहे. या पूर्व पडताळणीचे ५७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाची मदत निवडणूक आयोगाने घेतली आहे.

पाच राज्यांतील निवडणूका पार पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग २२ राज्यांतील मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणी करण्याचे आदेश देणार आहे. हा आदेश येण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक लाख केंद्र प्रमुखांच्या साह्याने विशेष सखोल पडताळणीच्या अगोदर पडताळणी सुरु केली आहे. पडताळणीचे हे काम ५७ टक्के पूर्ण झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले. यासाठी निवडणूक आयोगाने देशात पहिल्यांदा कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे राज्यातील मतदार यादीत एकापेक्षा जास्त नावे असलेल्या मतदारांची नावे कमी होणार आहेत. त्यासाठी नावाबरोबर नाव, पत्ता, छायाचित्र, वय या सर्वांची जुळवणी केली जात आहे. एकाच नावाची अनेक मतदार राज्यात आहेत. त्यासाठी त्यांची छायाचित्र जुळवून पाहिली जात आहेत.