मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आता संस्थात्मक फेरीचे प्रवेश सुरू झाले आहेत. १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश सुरू राहणार असून, या फेरीसाठी ५० हजार ८४१ जागा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकीसाठी उपलब्ध असलेल्या २ लाख ३ हजार २९३ जागांपैकी चार फेऱ्यांमध्ये १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सर्वाधिक प्रवेश हे संगणक अभियांत्रिकी शाखेत झाले आहेत.

राज्यातील १७ विद्यापीठातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, यामध्ये २ लाख १८ हजार ९७६ जागा उपलब्ध आहेत. यापैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) २ ते १९ जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. या कालावधीत २ लाख ४५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आता संस्थात्मक फेरीअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. नियमित चार फेऱ्यांमध्ये १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे चार फेऱ्यानंतर ६६ हजार ५२४ जागा रिक्त राहिल्या. या जागांपैकी १५ हजार ६८३ जागा या व्यवस्थापन कोट्यासाठी उपलब्ध असून, उर्वरित ५० हजार ८४१ जागा या संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

संगणक अभियांत्रिकी शाखेला विद्यार्थांची पसंती

अभियांत्रिकीच्या चार फेऱ्यामध्ये संगणक अभियांत्रिकी या शाखेसाठी सर्वाधिक २३ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्याखालोखाल मेकॅनिकल इंजिनीअरिंग (१६,९१८), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (१५,९७१), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (१५,७८७), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (१२,४९४), सिव्हील इंजिनीअरिंग (१२,०९५) व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (१०,१९२) या शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

पुणे विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियानुसार चौथ्या फेरीअखेर राज्यात सर्वाधिक ५३ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, त्याखालोखाल ३० हजार ९०९ विद्यार्थ्यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मुंबई विद्यापीठांतर्गत २५ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १४ हजार ०२४ विद्यार्थ्यांनी, तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत ८ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

चार फेऱ्यांमध्ये झालेले प्रवेश

अभियांत्रिकी शाखा

झालेले प्रवेश

कॉम्प्युटर इंजिनीअरिंग – २३,२३०

मेकॅनिकल इंजिनिअरिंग – १६,९१८

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग – १५,९७१

कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग – १५,७८७

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी- १२,४९४

सिव्हील इंजिनीअरिंग — १२,०९५

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १०,१९२

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स – ८,८१६

कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग

(आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ) – ५,४८०

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग – ३,९३६

जिल्हानिहाय झालेले प्रवेश

पुणे – ४१,१२२

नागपूर – १५,४८७

नाशिक – १०,५७०

कोल्हापूर – ९,६६९

मुंबई उपनगर – ९,०१२