मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या वाढत असताना त्यांच्या चार्जिंगसाठी सरकारी यंत्रणांकडून पायाभूत सुविधा उभारण्यास वेग आला आहे. एसटी महामंडळाने राज्यातील ४५ ठिकाणी २८५ चार्जर्स उभारले असून आणखी १०० ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे, बेस्टने खासगी ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा खुली करून २०२५-२६ मध्ये तब्बल ८.४५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. आता राज्यातील ५०हून अधिक आरटीओ कार्यालयांमध्येही चार्जिंग स्थानके उभारण्याचा प्रस्ताव असल्याने ई-वाहनांसाठी सरकारी चार्जिंग सुविधांचे जाळे विस्तारत आहे.

एसटी महामंडळाने ५१५० ई-बस प्रकल्पांतर्गत राज्यातील विविध आगारांमध्ये चार्जिंग स्थानके उभारली आहेत. सध्या ४५ ठिकाणी ही स्थानके पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, त्यामध्ये एकूण २८५ चार्जर्स बसविण्यात आले आहेत. प्रत्येक आगाराच्या गरजेनुसार किमान दोन ते कमाल १७ चार्जर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

खासगी ई-वाहनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या चार्जिंग सुविधेतून बेस्टला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८.४५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. खासगी ई-वाहनांसाठीचे चार्जिंग दर कंत्राटदाराकडून वेळोवेळी निश्चित केले जातात. चार्जिंगमधून बेस्टला प्रति युनिट ११.२२ रुपये, तर प्रत्येक वाहन उभे करण्यासाठी दरमहा दोन हजार रुपये महसूल मिळतो. राज्यातील ५०हून अधिक आरटीओ कार्यालयांमध्ये ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

खासगी वाहनांना ‘नो एन्ट्री’; महसूल शून्य

एसटीच्या चार्जिंग स्थानकांवर सध्या केवळ एसटीच्या विद्युत बसगाड्यांनाच चार्जिंगची सुविधा दिली जात आहे. खासगी ई-वाहनांना या स्थानकांवर प्रवेश नसल्याने त्यातून कोणताही महसूल मिळत नसल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. ई-बसची संख्या वाढविण्यासोबतच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर एसटीचा भर आहे. त्यानुसार भविष्यात राज्यात आणखी १०० ठिकाणी ई-वाहन चार्जिंग स्थानके उभारण्याचे नियोजन आहे.

‘बेस्ट’कडून सुविधा एसटीच्या तुलनेत बेस्टने खासगी ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा खुली केली आहे. बेस्टच्या विविध आगार आणि टर्मिनसवर खासगी विद्युत वाहनांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध असून, मेसर्स रिलायन्स बी.पी. मोबिलिटीसोबत झालेल्या करारानुसार ही सेवा दिली जात आहे. बेस्टच्या विविध आगारांमध्ये दररोज सरासरी १५ खासगी ई-वाहने चार्जिंगसाठी येतात. कुर्ला, वांद्रे, वरळी, मरोळ, दिंडोशी, मालवणी, घाटकोपर आणि ओशिवरा यांसह विविध आगारांमध्ये चार्जिंगची क्षमता वाढविण्यात आली आहे.