मुंबई: पुण्यात घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून राज्यात येणाऱ्या बनावट मद्य विरोधात धडक मोहीम उघडली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख,सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोकण विभागीय उपायुक्त प्रदिप पवार यांनी परराज्यातील बनावट/अवैध मद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी दिलेल्या सूचनेप्रमाणे खास पथकाने मोठी कारवाई करून दोन कोटींची बनावट व्हिस्की जप्त केली.

निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दुय्यम निरीक्षक व त्यांच्या सहकारी स्टाफने पनवेल-मुंब्रा हायवे, दहीसर मोरी, ता. जि. ठाणे. या परिसरातून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर, मोकाशीपाडा, पनवेल-मुंब्रा हायवे, दहीसर मोरी, ता. जि. ठाणे. येथे सापळा रचला असता सदर ठिकाणहून चॉकलेटी व पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा मॉडेल क्र. प्रो ३०१८ एक्स.पी. (सहाचाकी) ट्रक क्र. जीजे-२३-एवाय-१७१८ या वाहनाला अडवून वाहनाचा चालक याच्याकडे सदर ट्रक मध्ये कशाची वाहतूक करत असल्याबाबत चौकशी केली असता, त्याने सदर ट्रक मध्ये ऑटोमोबाईल पार्टस असल्याचे सांगितले. मात्र या गाडीत अवैध मद्य असल्याबाबतची खात्रीलायक बातमी मिळाली असल्याने अधिकाऱ्यांनी सदर ट्रकची ताडपत्री सोडुन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाकी रंगाचे बॉक्स असल्याचे दिसून आले. सदर बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये गोवा या राज्यामध्ये निर्मिती केलेले १८० मिली. क्षमतेच्या बनावटी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारचे बॅच नं. व कमाल किंमत आढळून आले नाही. तरी सदर मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की या बॅण्डचे १५३० बॉक्स (७३४४० बाटल्या) अशाप्रमाणे मद्यसाठा आढळून आल्याने आरोपी प्रविण किशनलाल कुमार, वय २३ वर्षे, रा. दादूसन बावरला, ता. सांचोर, जि. जालोर, राज्य-राजस्थान-३४३०४१. यास अटक करुन परराज्यातील विदेशी मद्याच्या वाहतुकीसाठी वापरलेला चॉकलेटी व पांढऱ्या रंगाचा आयशर कंपनीचा मॉडेल क्र. प्रो ३०१८ एक्स.पी. (सहाचाकी) ट्रक क्र. जीजे-२३-एवाय-१७१८ या वाहनासह परराज्यातील विदेशी मद्याचे एकूण १५३० बॉक्स, एक मोबाईल फोन असा अं. किंमत रु. १,८९,६६,८००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर आरोपी इसमाविरूध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०३ प्रमाणे गुन्हा नोंद केला.

सदर कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, यांनी दुय्यम निरीक्षक, श्री. रिंकेश दांगट, दुय्यम निरीक्षक श्री एच. बी. यादव, सहा. दुय्यम निरीक्षक श्री महावीर कोळेकर, तसेच जवान सर्वश्री. कुणाल तडवी, अमीत सानप, हनुमंत गाढवे, सागर चौधरी जवान नि. वाहनचालक यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक. श्री. दिगंबर शेवाळे, हे करत आहेत.

आपल्या परिसरात कोठेही बनावट महा, परराज्यातील मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असेल अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यासारख्या पदार्थाची किंवा द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास १८००२३३९९९९ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच ८४२२००११३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही माहिती देण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.