मुंबई : महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी अनुभवायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्याच जाणवू लागला आहे. प्रामुख्याने विदर्भात किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाला आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान कमी झाले आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तापमानातील घसरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा यासह राजस्थानमध्येगी थंडीचा कडाका जाणवू शकतो. दरम्यान, पुढील दोन आठवडे महाराष्ट्र, तसेच मध्य भारतातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यात शुक्रवारी नीचांकी किमान तापमान जळगाव येथे नोंदविण्यात आले. तेथे ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल नाशिक येथे १०.९ अंश सेल्सिअस, अहिल्या नगर ११.४ अंश सेल्सिअस, बीड ११ अंश सेल्सिअस, गोंदिया १०.५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
पहाटे गारवा, दिवसा उकाडा
बहुतांश भागांत किमान तापमान १४ ते १६ अंशादरम्यान तर सगळीकडेच कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाहाटे धुके, गारठा, तर दुपारी कडाक्याचा उन्हाळा अशा स्थितीला तोंड द्यावे लागत आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानातही हळूहळू वाढ होऊ लागेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे नोंदविण्यात आले. तेथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तापमानातील तफावत
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तसेच सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
