मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाचे पैसे अद्याप एकाही कर्ज खात्यावर जमा झाले नाहीत. अद्याप मदत कुणाला मिळणार, किती मिळणार या बाबत संभ्रम आणि साशंकता असतानाही प्रचार, प्रसार आणि प्रसिध्दी करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे. या १० कोटींच्या निधीतून वृत्तपत्रे, दृकश्राव्य माध्यम, रेडिओ, यू ट्यूब, इंस्टाग्राम, अशा समाज माध्यमातूनही या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. आता या योजनेची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मार्फत माध्यम आराखडा राबवण्यास व त्यासाठी येणाऱ्या ९ कोटी ९९ लाख ७८ हजार ८०० रुपयांच्या खर्चास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या योजनेची माहिती दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्त वाहिन्या, मराठी मनोरंजन वाहिन्या, पाँडकास्ट, होर्डिंग, रेल्वे स्टेशनवरील एलईडी स्क्रीन, एसटी महामंडळाची बस स्थानके, डिजिटल मिडियाद्वारे शेतकरी व जनतेला दिली जाणार आहे.
‘ग्राम विकास’चे जाहिरातीसाठी एक कोटी
राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत ग्रामीण भागातील जनतेशी संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेअंतर्गत झालेल्या कामांची व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी १ कोटी ९७ लाख रुपयांचा प्रसिद्धी माध्यम आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्राम विकास विभागाच्या वतीने या खर्चास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
