मुंबई : राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याला गती आली आहे. बुधवारअखेर ७३.४८ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ३ हजार ६७३ कोटी ९२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणाऱ्या मदतीच्या निकषांत वाढ केली आहे. त्यानुसार दुष्काळी मदतीसाठी राज्य सरकारकडून सुधारीत प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
राज्यातील सहा महसूल विभागातील ३०४ तालुक्यांतील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांतील शेतकरी ओळख क्रमांक काढलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी पूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
त्यानुसार बुधवारअखेर ७३.४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३ हजार ६७३ कोटी ९२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक २९.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार ४८०.१० कोटी रुपये जमा केले आहेत. त्याखालोखाल पुणे विभागातील १३.२४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ६६१.९५ कोटी रुपये, नाशिक विभागातील १३.०६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ६५२.९९ कोटी रुपये, अमरावती विभागातील ११.६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८२.६० कोटी, नागपूर विभागातील ५.३७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २६८.३६ कोटी आणि कोकण विभागातील ५६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २७.९३ कोटी रुपये जमा केले आहेत.
राज्यात ३.०९ कोटी जणांची शेतकरी म्हणून नोंद आहे, त्यापैकी १.२९ कोटी शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण ८२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा करण्याला परवानगी दिली आहे. त्यापैकी एकूण ७३.४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा झाला आहे. शेतकरी ओळख क्रमांक काढलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारपर्यंत अग्रीम जमा केला जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.
आठवडाभरात केंद्राकडे सुधारीत प्रस्ताव
केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदत निकषांत सरासरी ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या खरीप, बागायती, फळपिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पीक नुकसानीपोटी कृषी विभागाने सुमारे १६ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे, त्यात वाढ होईल. यापूर्वी राज्य सरकारने एकत्रित सुमारे ३१ हजार कोटी रुपयांच्या मदत निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. आता त्यात सुधारणा करून नवीन निकषांनुसार प्रस्ताव तातडीने सादर केला जाईल, अशी माहिती मकरंद जाधव यांनी दिली.
