मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) औषध उत्पादन व विक्री आस्थापनांची तपासणी करण्याचा मागील तीन महिन्यांपासून धडाका लावला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये २ हजार ९०२ उत्पादन व विक्री आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीमध्ये ८८० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही ॲलोपॅथी औषध उत्पादकांवर करण्यात आली आहे.
राज्यातील औषध उत्पादन व विक्री आस्थापनांची नियमितपणे तपासणी करून गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, विक्रीबाबत नियमांचे पालन करण्यासंदर्भात पडताळणी करण्यात येते. औषधांची गुणवत्ता व नागरिकांची सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये तब्बल २ हजार ९०२ उत्पादन व विक्री आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये ६०७ उत्पादन आस्थापने असून, २ हजार २९५ विक्री आस्थापने आहेत. तपासणी केलेल्या आस्थापनांपैकी ८८० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १४० उत्पादन आस्थापने तर ७४० विक्री आस्थापनांचा समावेश आहे. कारवाई करण्यात आलेल्या उत्पादन आस्थापनांमध्ये सर्वाधिक ५८ ॲलोपॅथी औषधांच्या आस्थापनांचा समावेश आहे. यातील १३ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर ४५ परवाने रद्द करण्यात आले.
आयुर्वेदिकच्या ३१ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील २६ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर ५ परवाने रद्द करण्यात आले. होमिओपॅथीच्या एका आस्थापनाचा परवाना रद्द केला, तर एका आस्थापनाचा परवाना निलंबित केला. २५ रक्तपेढ्यांवर केलेल्या कारवाईमध्ये २१ परवाने निलंबित, तर ४ रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले. राज्यातील १८ रक्त साठवणूक केंद्रांवर कारवाई करण्यात आली. यातील १२ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर सहा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले. सौंदर्यप्रसाधनांच्या ४ उत्पादन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनाचा परवाना रद्द करण्यात आला. दोन प्रयोगशाळांचे परवाने निलंबित करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस, सुनावणीची संधी देऊन, लागू कायदे व नियमांनुसार परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची नियामक कारवाई करण्यात आली असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.
तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी
तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव, तांत्रिक व्यक्तीच्या अनुपस्थितीत चाचणी, उत्पादनाच्या गुणवत्तेचा वार्षिक आढावा तयार न करणे, निर्जंतुकीकरणातील नोंदींमध्ये विसंगती आढळणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवाल उपलब्ध नसणे, बॅच उत्पादन व चाचणी अभिलेख अपूर्ण ठेवणे, परवान्यात मंजूर नसलेल्या औषधांचे उत्पादन, नोंदणीकृत रक्त संक्रमण अधिकारी नियुक्त नसणे किंवा नोंदणीकृत रक्त संक्रमण अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत रक्त संक्रमण किंवा वितरण करणे, रिकाम्या रक्तपिशव्यांचा साठा, खरेदी व वापराच्या नोंदी न ठेवणे, आवश्यक तापमान नसणे, आपत्कालीन किटमध्ये आवश्यक औषधे नसणे किंवा मुदतबाह्य औषधे असणे, औषधांची विक्री किंवा वितरण नोंदणीकृत फार्मसिस्टच्या प्रत्यक्ष देखरेखीशिवाय करणे, विना देयक औषधांची खरेदी-विक्री करणे, विक्री देयकांवर बॅच नंबर, कालबाह्य मुदतीची तारीख आणि उत्पादन तारीख नमूद न करणे अशा त्रुटी आढळून आल्या.
