मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिलमध्ये मोहीम राबविली होती. या मोहिमेंतर्गत राज्यभरात २९० ठिकाणी छापे टाकून तब्बल २ कोटी ५२ लाख २३ हजार ३८४ रुपये किमतीचे गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली. तसेच मुंबईच्या पाचही सीमेवर केलेल्या तपासणीतून ३६ हजार २१९ रुपये किमतीचे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले.

गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई

एफडीएला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या अनुषंगाने धडक कारवाई हाती घेतली. या कारवाई अंतर्गत २९० ठिकाणी तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये तब्बल २ कोटी ५२ लाख २३ हजार ३८४ रुपये किमतीचे गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारी व अन्य प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवायांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये २६१ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, २८८ व्यक्तींना अटक करण्यात आली.

दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई

दुधात भेसळ केल्याप्रकरणी ९ एप्रिल रोजी सकाळी ४.३० वाजता मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाख युनिट क्रमांक ९ व अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबईचे अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा जाधव, रामू माळी, श्रीपाद धरंगुट्टी व प्रतीक्षा मसुगडे आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) डॉ. भुषण मोरे यांनी कारवाई केली. वर्सोवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुधात भेसळ करण्यात येणाऱ्या चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. दूधाच्या नामांकित कंपन्यांच्या पिशव्या फाडून त्यामध्ये पाण्याची भेसळ करण्यात येत असल्याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली, या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ८ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून किंमत ३६ हजार २१९ एकूण ६२१ लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असून प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास त्याबाबत प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर सविस्तर माहिती नोंदवावी. प्रतिबंधित अन्नपदार्थामुळे मानवी शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम किंवा दुष्परिणाम विचारात घेऊन अन्नपदार्थांचे सेवन करू नये, तसेच अन्नपदार्थाच्या सेवनाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी केले.