मुंबई : ‘आरोग्याशी तडजोड नाही, आरोग्याशी घातक पदार्थांना थारा नाही’ या संकल्पनेअंतर्गत राज्यातील भेसळखोर, अस्वच्छ अन्न उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाने राज्याच्या सर्व विभागांमध्ये धडक मोहीम उघडली आहे. मसाला, गुटखा, दुध व दुग्धजन्य पदार्थ, आंबे व आईसक्रीम आदींची विक्री करणाऱ्या ८६ दुकानांना टाळे ठोकले असून १०२ व्यक्तींना अटक केली आहे. जप्त साठा केलेल्या मालाची किंमत तब्बल १ कोटी ५८ लाख आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कारभार हाती घेताच धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने राज्यात जोरदार छापेसत्र आरंभले आहे. गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू दुकानांवरील छाप्यांमध्ये पहिल्यांदाच तब्बल २७२ अधिकाऱ्यांनी भाग घेतला. १३० दुकानांची तपासणी केली. त्यामध्ये १०३ दुकानांमध्ये ३४ लाख किंमतीचे प्रतिबंधित पदार्थ आढळले असून ते जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायद्याचे अंतर्गत ७२ गुन्हे नोंद केले असून १०२ व्यक्तींना अटक झाली आहे. यामध्ये ९ वाहने जप्त केली आहेत.

दुसरीकडे कमी दर्जाचे, असुरक्षित अन्नपदार्थ तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे आवरण असलेल्या अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची राज्यात छापे मोहीम चालू आहे. या मोहिमेअंतर्गत ७३ दुकानांची तपासणी करण्यात आली. बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दुध व दुग्धजन्य पदार्थ, गुळ, खाद्यतेल, तूप, आईसक्रीम, मसाल्याच्या पदार्थांचा ९० हजार किलो साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १ कोटी २४ लाख इतकी आहे.

कौतुकाचा वर्षाव

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांवर राज्यभर व्यापक पद्धतीच्या छापेसत्रामुळे मंत्रालयामध्ये चर्चा रंगल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा विभाग आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अन्न व प्रशासन विभागाने जितक्या कारवाया केल्या आहेत, त्यापेक्षा कितीतरी अधिक पट कारवाया मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच एका आठवाड्यात करण्यात आलेल्या आहेत. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालील अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून रामदेवबाबा यांच्या पतंजलीची उत्पादने सुद्धा सुटलेली नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या धडकाकेबाज कारवाईचे समाज माध्यमांवर जोरदार कौतुक होत आहे.

नि:शुल्क संपर्क क्रमाक

अन्नपदार्थांच्या तक्रारीबाबत शंका येताच नागरिकांनी १८००२२२३६५ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधवा. स्वतचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा व आस्थापनाचा पत्ता आणि कोणत्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

शंका येताच तक्रार करा

नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळअजिबात खपवून घेतला जाणार नाही. त्यात कुणी भेसळ केल्यास वा प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा उत्पादन केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.

  • तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन