: राज्याने मत्स्य निर्यातीत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, २०२०-२१ मधील ३ हजार ६८४ कोटींच्या तुलनेत निर्यात दुप्पट झाली आहे. निर्यातीचे परिमाणही वाढून वार्षिक २.२७  लाख टनांवर पोहोचले आहे. या निर्यातीत कोकण किनारपट्टीचे योगदान मोठे आहे. कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कोकणातील कोळंबीला मोठी मागणी आहे. कोकणातील कोळंबीची गुणवत्ता आणि विशिष्ट चवीमुळे परदेशात मागणी वाढली आहे, असेही राणे म्हणाले.

अमेरिकेला सर्वाधिक निर्यात

अमेरिका भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ ठरली आहे. अमेरिकेला २०२४-२५ मध्ये २२ हजार ७२३ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. त्यानंतर चीनला १० हजार ६६८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. त्या खालोखाल युरोपियन युनियन, जपान या देशांतून भारतीय मासळीला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ – उतार आणि वाढत्या उत्पादन खर्चा सारख्या आव्हानांवर मात करत महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेशासारख्या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे, असेही राणे म्हणाले.