मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मत्स्य पालन करणारे शेतकरी आणि व्यवसायिकांना मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे १९ हजार मत्स्य शेतकरी आणि व्यावसायिकांचे सुमारे ८०.८७ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीच्या इतिहासात मत्स्य व्यावसायिकांना लाभ होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. मत्स्य व्यावसायिकांची संख्या आणि कर्जमाफीची रक्कम जास्त नाही. कर्जमाफी मिळाल्यास मत्स्य व्यावसायिकांमध्ये चांगला संदेश जाईल. व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल. कृषीचा दर्जा दिल्याचा काहीतरी फायदा होईल, त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मत्स्य व्यवसायिकांना मिळावा, अशी आग्रही मागणी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
मंत्री राणे यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील मत्स्य पालन करणारे शेतकरी, व्यावसायिक आणि त्यांच्या कर्जाची रक्कम आदीची माहिती संकलित करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. या बाबत सहकार विभागाशी समन्वय साधण्याची आणि मत्स्य व्यवसायिकांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्यावर सोपविली आहे.
कर्जमाफीचा लाभ कुणाला ?
मत्स्य व्यावसयिकांना खेळते भांडवल म्हणून किसान क्रेडीट कार्डवर पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. चालू आर्थिक वर्षात असे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची, मत्स्य व्यावसायिकांची संख्या १९,१०० इतकी आहे असून, त्यांना सुमारे ८०.८७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले होते. या सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसाय विभाग प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे. सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेत ही रक्कम किरकोळ असून, मत्स्य व्यवसायिकांना लाभ मिळावा, अशी मागणी मत्स्य व्यवसाय विभागाकडून केली जाणार आहे.
कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यांनी मत्स्य पालन करणारे शेतकरी, व्यावसायिक आणि कर्ज रक्कम आदींची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
