मुंबई : देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात सुमारे चार लाख कोटींची विदेशी गुंतवणूक आली असून देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा २९ टक्के आहे. यापैकी २०२२-२३ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात १ लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक आली असून देशात राज्याचा पहिला क्रमांक लागला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारच्या उद्योग विभागाच्या वतीने राज्यांतर्गत विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २०२२-२३ या वर्षांत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, दिल्ली, गुजरात, तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२३ या काळात महाराष्ट्रात चार लाख सात हजार कोटींची एकत्रित गुंतवणूक झाली. याच काळात कर्नाटकात २४ टक्के, गुजरातमध्ये १७ टक्के तर दिल्ली १३ टक्के गुंतवणूक झाली.

गेल्या आठवडय़ात पुण्याजवळ मुंढवा येथे सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि ४० हजार रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या आर्थिक सेवा क्षेत्रात राज्य सरकार आणि ‘बजाज फिनसव्‍‌र्ह’ या कंपनीबरोबर करार झाला. आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील मोठी गुंतवणूक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले होते. यापाठोपाठ केंद्राच्या विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याच्या आकडेवारीने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून फडणवीस यांनी यानिमित्ताने ट्विटरवरून महाविकास आघाडीला टोले लगावले आहेत.  

होय ! पुन्हा एकदा विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर १ वर.. आम्ही सातत्याने सांगत होतो की खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवे सरकार आले आहे. आता महाराष्ट्रात गुंतवणुकीता ओघ वाढेल.

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra foreign investment higher than any other state in india zws
First published on: 06-06-2023 at 03:16 IST