मुंबई: वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्ते, रेल्वे आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी वन्यप्राण्यांच्या सुरक्षित हालचालींची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्याच्या वन विभागाने दिले आहेत. रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेला आहे.

वनक्षेत्राचे अथवा वन्यजीवांच्या अधिवासाचे विभाजन होत असल्यास, संबंधित ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन अंडरपास, ओव्हरपास यांसारख्या उपाययोजनांचा समावेश प्रकल्पाच्या सविस्तर अहवालात करावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

वन विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या परिपत्रकातून संबंधित वन अधिकाऱ्यांना प्रकल्प प्रस्तावांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींसाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश न करताच काही प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.

रस्ते आणि रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे विकासाला चालना मिळत असली, तरी त्याचा वन्यजीवांच्या अधिवासावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय आहे. जंगलातून जाणाऱ्या मार्गांमुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग खंडित होतात. रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसून अनेक प्राण्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन करतानाच वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक ठरते.

वनक्षेत्रातून जाणाऱ्या प्रकल्पांच्या प्रस्तावांची तपासणी करताना संबंधित मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांनी वन्यजीवांच्या हालचालींच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करावा. अधिवासाचे विभाजन होत असल्यास, स्थानिक परिस्थितीनुसार योग्य उपाययोजना प्रस्तावित करूनच प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावा, असे वन सचिव संजय खंदारे यांनी निर्देश दिले आहेत.

वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, १९८० आणि वन (संरक्षण व संवर्धन) नियम, २०२३ अंतर्गत जारी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात आले आहेत.

वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्गांची तरतूद प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच केल्यास नंतरच्या काळात उद्भवणारे धोके कमी करता येऊ शकतात. मात्र, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रस्तावांच्या छाननीतील काटेकोरपणा यावरच निर्णयाचे यश अवलंबून असेल. विकासकामे करताना वन्यजीवांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष होऊ नये, हा या निर्देशांचा प्रमुख उद्देश आहे.

वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे संबंधित राज्यातील सर्व वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना ते पाठविण्यात आले आहे.