मुंबई: राज्यातील वणवे रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, यासाठी ऑस्ट्रेलियात वणवे रोखण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतात याचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेतदिली.
प्रसाद लाड, संजय खोडके यांनी कोकण तसेच अन्य भागांत जंगलांत लागणाऱ्या वणव्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. यावर उत्तर देतना जगातील वणवे नियंत्रणाच्या प्रभावी पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियात पाठविले जाईल. तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजना, आधुनिक यंत्रसामग्री आणि अग्निशमन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली.
त्याचप्रमाणे कोकणातील वणव्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना मदत मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगताना कोकणात बहुतांश वणवे खासगी जमिनीवरील झाडे, पालापाचोळा किंवा गवताला लागतात. वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्राबाहेर घटना घडल्यास विद्यमान नियमांनुसार वन विभागाकडून नुकसानभरपाई देता येत नाही. मात्र, संबंधित महिलेच्या कुटुंबाला अन्य शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.
वणवे रोखण्यासाठी उपग्रहाद्वारे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या माध्यमातून सतत देखरेख केली जात असून, आग लागल्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. वन संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकही त्यात सक्रिय सहभाग घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोहाची फुले गोळा करणाऱ्यांना जाळ्या देणार
विदर्भात मोहाची फुले गोळा करण्यासाठी काही ठिकाणी आग लावण्याची प्रथा असल्याचे सांगत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाकडून मोहाची फुले आणि सुरुंगीची फळे गोळा करण्यासाठी विशेष जाळ्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आग लावण्याची गरज भासणार नाही आणि वनउत्पादनांची गुणवत्ताही सुधारेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
