मुंबई : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या महाराष्ट्रातील प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी या चार ऐतिहासिक किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणार आहे. या किल्ल्यांवर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येणार असून, त्यासाठी १२ कोटी ९३ लाख ८६ हजार ७२० रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून ही सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून घेतली जाणार आहे.
भारतातील ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. यापैकी प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी हे राज्य संरक्षित स्मारके आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्याबरोबरच किल्ल्यांवर घडणाऱ्या अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक किल्ल्यावर १९ सुरक्षा रक्षक, निवासाचीही व्यवस्था
प्रत्येक किल्ल्यावर १९ सुरक्षारक्षक आणि एक सुरक्षा पर्यवेक्षक अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार चारही किल्ल्यांवर मिळून ७६ सुरक्षारक्षक आणि चार सुरक्षा पर्यवेक्षक असे एकूण ८० कर्मचारी तैनात असतील. या कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती तसेच कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या समन्वयाने पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय निश्चित करणार आहे.
सुरक्षारक्षकांच्या निवास व कामकाजाच्या सुविधेसाठी किल्ल्यांच्या ठिकाणी पुरातत्वीय निकषांनुसार पोर्टेबल कॅबिनची व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या किल्ल्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अवलंबिलेली पद्धत, मंडळ अथवा पीपीपी मॉडेल, सीएसआर मॉडेल तसेच अन्य राज्यांतील सुरक्षा धोरणांचा अभ्यास करण्याचे निर्देश संचालनालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सहा महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १२ मे २०२६ रोजी यासंदर्भात यापूर्वी प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने सुरक्षाव्यवस्थेबाबत सुधारित प्रस्ताव सादर केल्यानंतर आधीचा शासन निर्णय अधिक्रमित करून नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
