मुंबई : महाराष्ट्रीय परंपरेची खास ओळख असलेल्या गणेशोत्सवाला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत स्थान प्राप्त होण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी राज्याच्या सर्व शासकीय विभागांना गणेशोत्सव काळात कामे नेमून दिली असून राज्यातील ४८० सार्वजनिक गणेश मंडळांना पारितोषिकाच्या रुपाने दिड कोटी रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.

गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा देण्याची घोषणा मागच्या वर्षी झाली होती. यंदा गणेशोत्सवाला ‘युनेस्को’च्या यादीत नेण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा निश्चिय आहे. त्यासाठी गणेशोत्सव काळात राबवण्याच्या कार्यक्रमाचा आराखडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. या काळात तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर गणेशत्सव स्पर्धा घेतली जाणार आहे. १० राज्यात, भारताबाहेर एका देशात, दिल्लीत पाच दिवस आणि मुंबईत आठ दिवस गणेशोत्स काळात सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

राज्याचे सर्व ३८ विभाग आणि महामंडळांना त्यासाठी विविध कामे नेमून दिली आहेत. आरोग्य विभागाने गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आयोजित करायची आहेत. दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग भाविकांसाठी सुलभ दर्शन, रॅम्प, व्हीलचेअर, सांकेतिक भाषेतील आरती आणि ‘स्पर्शदर्शन’ सुविधा पुरविण्याची जबाबदारी उचलायची आहे. ऊर्जा व पर्यावरण विभागामार्फत गणेश मंडळांना सुलभ वीज जोडणी, सौरऊर्जेवरील मंडप आणि एलईडी रोषणाईला प्राधान्य देण्यासाठी काम करायचे आहे.

उद्योग, सहकार व कृषी विभागाकडून स्थानिक कारागीर, सूक्ष्म आणि लघु उद्योग व महिला बचतगटांना मोदक, प्रसाद साहित्य आणि पूजा साहित्याच्या विक्रीसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रसिद्घ् गणेशांचे आभासी पद्धतीने दर्शन घेता यावे तसेच घरगुती गणेशाची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात येणार आहे. गणेश रिल्सच्या स्पर्धा, मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

राज्यातील प्रसिद्ध गडकिल्ल्यांना ‘युनेस्को’च्या वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात वर्षी सांस्कृतिक विभागाला यश आले होते. त्या पार्श्वभूमीवर विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गणेशोत्सव वारसा यादीच्या पटलावर नेण्याचा निर्धार केला आहे. राज्य महोत्सवांतर्गत स्पर्धांच्या समन्वयकाची जबाबदारी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकादमी यांच्याकडे आहे. उपक्रमांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.