मुंबई : जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाचे आयोजन २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी. अद्ययावत तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांसह कृषीचे विद्यार्थी, प्राध्यापकांसह नव उद्योजक, स्टार्टअप आणि गुंतवणूकदारांना ओळख व्हावी. कृत्रिम बुद्धिमतत्तेचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बाधांवर किफायतशीर दरात उपलब्ध व्हावे यासाठी अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित होते.
एआय फॉर ॲग्री ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (एडीबी), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंन्स्टिट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रापिक्स (आयसीआयएसएटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
राज्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ च्या अंमलबजावणीकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आदींसाठी एक व्यासपीठ म्हणून परिषदेचा उपयोग करून घेता येईल, असेही भरणे म्हणाले.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विदा (डेटा) – आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या धोरणांतर्गत महा एजीएक्स (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज), एआय-सक्षम ट्रेसिबिलिटी प्रणाली, एआय आधारित भू-स्थानिक बुद्धिमत्ता इंजिन, शेतकरी-केंद्रित एआय सल्ला मंच-महाविस्तार या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक केंद्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यरत करण्यात आले आहे, असेही भरणे म्हणाले.
