मुंबई : शिक्षकांना परिक्षांच्या काळात मतदान नोंदणी कर्मचारी (बीएलओ) म्हणून काम करण्याची सक्ती केली जाणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. शिक्षकांकडील बीएलओचे काम कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विक्रम काळे, अभिजित वंजारी, ज्ञानेश्वर म्हात्रे, सतिश चव्हाण, किरण सरनाईक, राजेश राठोड आदींनी शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा प्रश्न उपस्थित केला. शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करा. शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करा. नसबंदी केलेल्या कुत्र्यांची मोजणी करा, असे आदेश दिले जातात. शिक्षकांना वर्षभर बीएलओचे काम करण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. ऐन परिक्षांच्या काळात बीएलओच्या कामाची सक्ती केली जाते. त्यामुळे शिक्षकांकडील बीएलओचे काम कायमस्वरुपी रद्द करा, अशी एकमुखी मागणी सर्व सदस्यांनी केली.

पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांकडे निवडणुकीच्या संदर्भातील कामे दिली जातात. निवडणूक काळात बीएलओचे काम दिले जाणार नाही. तसेच बीएलओचे काम कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेण्यात येईल. त्या शिवाय शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे. समूहिक सुविधा केंद्र किंवा सेतूच्या माध्यमातून करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. त्या बाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे रद्द करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

समित्यांचे विलिनीकरण, सरल व डायस प्रणालीचे एकत्रिकरण

शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट २०२४ अन्वये शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व आरटीई अॅक्टनुसार करावयाची अनिवार्य कामे या बाबतचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यानुसार जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधीमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे ही ननिवार्य कामे आहेत. तसेच दिनांक २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार अशैक्षणिक कामे शिक्षकांना सोपविण्यात येऊ नयेत, या बाबत इतर विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. शिक्षकांना देण्यात येणारी शैक्षणिक व अशैक्षणिक कामे विचारात घेऊन शिक्षकांना प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच शिक्षकांची कामे सुलभ व्हावीत यासाठी सरल व डायस प्रणालींचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. तसेच, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे विलिनीकरण करुन समित्यांची संख्या देखील कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, असेही भोयर म्हणाले.