शिसे आणि अजिनोमोटो यांच्या अतिप्रमाणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मॅगीवर राज्यात बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केला. मात्र, राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मॅगीच्या नमुन्यांत कोणतेही घातक पदार्थ नसल्याचा निर्वाळा दिला असतानाही बंदीचा हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मॅगीमध्ये निश्चित प्रमाणापेक्षा शिसे आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नेस्लेने बाजारातून मॅगीची सर्व पाकिटे माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅगी खाण्यास सुरक्षित आहे. मात्र, आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवू आणि मगच पुन्हा परतू’, असा निर्धार मॅगीउत्पादक असलेल्या नेस्ले कंपनीने व्यक्त केला आहे. नेस्लेचे जागतिक प्रमुख (ग्लोबल सीईओ) पॉल बल्क यांनी शुक्रवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मॅगीतील शिसे व अजिनोमोटोच्या प्रमाणाची अन्न व औषध प्रशासानने गंभीर दखल घेऊन मुंबई, ठाणे व सोलापूर येथून मॅगीचे नमुने तपासणीसाठी गोळा केले. पुणे व मुंबईतील एफडीएच्या प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मुंबईतील तपासणीमध्ये शिसाचे प्रमाण २.५ पीपीएम (प्रती दशलक्ष भाग) एवढे असणे अपेक्षित असताना मॅगीत हे प्रमाण १.४ एवढे असल्याचे आढळून आल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. एकूण नऊ नमुने गोळा करण्यात आले असून त्यात मुंबई व ठाण्यातील प्रत्येकी चार तर सांगलीतील एका नमुन्याचा समावेश आहे. यात प्रमाणित शिसापेक्षा जास्त मात्रा आढळून आली नसल्याचे डॉ. कांबळे म्हणाले. अजिनोमोटोच्या चाचणीचा अहवाल आज, शनिवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे.  
दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी रात्री पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मॅगीवर बंदी जाहीर केली. बापट म्हणाले, ‘नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून राज्यात मॅगीच्या
विक्रीवर बंदी घालण्यात येत असून, त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल.
शनिवारपासून दुकानांमध्ये अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासण्या सुरू करण्यात येतील. आरोग्याच्या दृष्टीने घटक पदार्थाचे प्रमाण सगळीकडे सारखे हवे. शिशाचे प्रमाण अधिक असलेल्या किती बॅचेस आहेत, हे खरेदीदाराला कळणार नाही, त्यामुळे ते अपायकारक ठरू शकते.’

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, मॅगीकडून नियमांचे उल्लंघन
विविध राज्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मॅगीने अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. अन्नसुरक्षेबाबत केंद्र सरकार कोणत्याही बाबतीत तडजोड करू शकत नसल्याचेही नड्डा म्हणाले.

मॅगीला नोटीस
भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. एस. मलिक यांनी नेस्ले इंडियाला नोटीस बजावली असून हानिकारक असलेल्या मॅगीच्या नऊ उत्पादनांची परवानगी रद्द का केली जाऊ नये अशी विचारणा केली आहे. मॅगी ओट्स मसाला नूडल्स परवानगी न घेता बाजारात आणल्याबद्दल कंपनीला जाब विचारण्यात आला आहे. दरम्यान, नेपाळ आणि सिंगापूर या देशांनी मॅगीची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.