मुंबई : राज्य दुष्काळात होरपळत असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि राज्य अतिथींच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने १२ कोटी ६८ लाख ६४ हजार ३४२ रुपये खर्चाच्या ४४ नवीन वाहनांच्या खरेदीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये चार कोटी सात लाख ६८ हजार रुपये किमतीच्या संरक्षित टोयोटा लँड क्रूझर ३०० या वाहनाचाही समावेश आहे. यासंदर्भातील शासन निर्णय राजशिष्टाचार विभागाने ९ ऑक्टोबर रोजी जारी केला.
राज्यात भेट देणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीची व्यवस्था मुंबईत शासकीय परिवहन सेवा, वरळी यांच्यामार्फत, तर अन्य जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील राजशिष्टाचार शाखेमार्फत केली जाते. मुंबईसाठी यापूर्वी ६४ वाहनांचा ताफा मंजूर करण्यात आला होता. मुंबई व मुंबई उपनगर वगळता अन्य जिल्ह्यांसाठी २२५ वाहनांचा आढावा मंजूर आहे.
मात्र, यातील काही वाहने नादुरुस्त झाल्याने किंवा त्यांचे आयुर्मान संपल्याने ती वापरातून काढण्यात आली आहेत. तसेच काही वाहनांची स्थिती आणि दर्जा समाधानकारक नसल्याने मान्यवरांच्या वाहतुकीत अडचणी निर्माण होत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रस्तावित ४४ वाहनांमध्ये ३२ टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक संरक्षित टोयोटा लँड क्रूझर ३००, सात मारुती एर्टिगा, एक टोईंग वाहन आणि एक १६ प्रवासी क्षमतेची अरबानिया बस यांचा समावेश आहे. इनोव्हा क्रिस्टासाठी सुमारे ६ कोटी ७९ लाख ८२ हजार रुपये, फॉर्च्युनरसाठी ६० लाख रुपये, तर लँड क्रूझरसाठी ४ कोटी ७ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
उर्वरित वाहनांमध्ये एर्टिगासाठी ८१ लाख १३ हजार ७०० रुपये, टोईंग वाहनासाठी नऊ लाख रुपये आणि अरबानिया बससाठी ३१ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.
ही वाहने केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलवरून एकल स्रोत पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. खरेदी करताना प्रचलित नियमांचे पालन आणि उपलब्ध निधीच्या मर्यादेत खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे. हा खर्च राज्याच्या अर्थसंकल्पातील मोटार वाहन खरेदीसाठीच्या संबंधित लेखाशीर्षाखालील निधीतून भागविण्यात येणार आहे.
