मुंबई : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या १५ पदकविजेत्या खेळाडूंना राज्य सरकारकडून तब्बल १७ कोटी ६५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मंजूर करण्यात आले. या खेळाडूंच्या मार्गदर्शकांनाही १ कोटी ७६ लाख ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांसाठी एकूण १९ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याच्या क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. राज्याचे क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत पदकविजेत्या खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देण्याची योजना यापूर्वीपासून लागू आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आली असून, त्याच अंतर्गत २०२५ आणि २०२६ मधील विविध स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना ही बक्षिसे मंजूर करण्यात आली आहेत.

यामध्ये सर्वाधिक रक्कम पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांना मंजूर झाली आहे. पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये वैयक्तिक कांस्य आणि सांघिक सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्यांना अनुक्रमे १ कोटी आणि २ कोटी २५ लाख रुपये, अशी एकूण ३ कोटी २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम मंजूर झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शकांना अनुक्रमे १० लाख आणि २२ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत.

क्रिकेटमधील टी-२० विश्वविजेत्यांनाही मोठे पारितोषिक देण्यात आले आहे. २०२६ च्या आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषकातील सांघिक सुवर्णपदकासाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोघांच्या मार्गदर्शकांना प्रत्येकी २२ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. धनुर्विद्येत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशदीप संजय भोसले यांना सांघिक सुवर्णपदकासाठी ५२ लाख ५० हजार रुपये, तर त्यांच्या मार्गदर्शकांना ५ लाख २५ हजार रुपये मंजूर झाले आहेत. प्रिथिका प्रदीप यांना सांघिक सुवर्णासाठी ५२ लाख ५० हजार, वैयक्तिक रौप्यपदकासाठी ५० लाख रुपये मिळणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शकांना अनुक्रमे ५ लाख २५ हजार रुपये देण्यात येतील.
सारंग जाधव यांना धनुर्विद्येतील सांघिक रौप्यपदकासाठी ३७ लाख ५० हजार रुपये, तर त्यांच्या मार्गदर्शकांना ३ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आरिनका विवेक दुबे यांना विविध आशियाई आणि जागतिक स्पर्धांतील पदकांसाठी एकत्रितपणे पारितोषिक मंजूर करण्यात आले आहे.

नेमबाज रुद्रांक्ष पाटील यांना आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकासाठी ७० लाख रुपये, तर प्रथमेश भालचंद्र शुंगे यांना धनुर्विद्येतील सांघिक रौप्यपदकासाठी ३७ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. नेमबाज शांभवी शरद वीरसागर यांनाही जागतिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरीसाठी एकत्रित पारितोषिक मंजूर झाले आहे. याशिवाय पॅरा बॅडमिंटनपटू प्रेमकुमार आले, मानसी जोशी, पॅरा-ॲथलेटिक्समधील दिलीप गावित आणि सवेश कुऱ्हारे यांनाही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीनुसार रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या पारितोषिकासाठी आवश्यक १९ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांचा निधी क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त यांच्या अधिपत्याखाली ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा खर्च २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील क्रीडा विभागाच्या तरतुदीतून करण्यात येणार आहे. संबंधित खेळाडू आणि मार्गदर्शक रोख पारितोषिकासाठी पात्र असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी क्रीडा आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या मार्गदर्शकांच्या योगदानालाही शासनाकडून मान्यता मिळणार आहे.